माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या बंगल्यात आग, किचन जळून खाक


बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या बुलढाणा शहरातील बंगल्यातील किचनला बुधवारी १९ जून रोजी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे. बंगल्याच्या वरच्या मजल्यावर असलेल्या किचनमधील फ्रिजचे कॉम्प्रेसर फुटल्याने ही आग लागली.

किचनसह इतर साहित्याचे नुकसान
या आगीमुळे किचनमधील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. एवढेच नाही तर, इतर रूममधील एसी (एयर कंडिशनर) आणि अन्य साहित्य देखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. घटनेची माहिती मिळताच नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि आग आटोक्यात आणली.

मोठी दुर्घटना टळली
आग लागली त्यावेळी डॉ. राजेंद्र शिंगणे हे बाहेरगावी होते, तर त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य शेजारच्या घरी होते. त्यामुळे सुदैवाने कोणतीही अनुचित घटना घडली नाही आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही, ही दिलासादायक बाब आहे. या घटनेने परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.