नोकरीच्या शोधात निघालेल्या परप्रांतीय तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून दुर्दैवी मृत्यू


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नोकरीच्या शोधात आपल्या भावासोबत पहिल्यांदाच पुण्याला निघालेल्या एका परप्रांतीय तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना बुधवार, १८ जून रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास मोहाडी शिवारात घडली. मयत तरुणाचे नाव राहुल साहब सरोज (वय २३, रा. शिकरारा, अलिशाहपूर, जौनपूर, उत्तर प्रदेश) असे आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कुटुंबाला हातभार लावण्यासाठी निघाला होता पुण्यात
राहुल सरोज हा उत्तर प्रदेशातील शिखरारा गावात आपल्या कुटुंबीयांसोबत राहायचा. त्याचा मोठा भाऊ गोपाळ पुण्यात मिळेल ते काम करून आपला उदरनिर्वाह करतो. कुटुंबाला आणि भावाला आर्थिक हातभार लागावा, या उद्देशाने राहुल पहिल्यांदाच भावासोबत रेल्वेने पुण्याला जात होता. १७ जून रोजी ते दोघे रेल्वेत बसले. बुधवार, १८ जून रोजी रात्री १० वाजता जळगाव येथून मुंबईकडे जात असताना, राहुलचा धावत्या रेल्वेतून तोल गेला आणि तो खाली पडला. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना मोहाडी शिवारातील रेल्वे खांब क्रमांक ४०९ ते ४१० दरम्यान घडली.

भावाचा आक्रोश आणि पोलिसांकडून नोंद
घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून तो शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला. याच रेल्वेत असलेला त्याचा भाऊ गोपाळला पुढे जाऊन या घटनेची माहिती मिळाली. तो देखील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाला. आपल्या भावाचा मृतदेह पाहून गोपाळने केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. या घटनेबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.