नशिराबाद-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नशिराबाद शहरात सध्या डासांचा मोठ्या प्रमाणावर उद्रेक झाला असून, यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहराच्या काही भागांत डेंग्यूचे रुग्ण आढळल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर, माजी सरपंच पंकज श्यामकांत महाजन आणि इतर ग्रामस्थांनी शुक्रवारी ३० मे रोजी दुपारी १२ वाजता नशिराबाद नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे डासांची उत्पत्ती थांबवण्यासाठी तातडीने धुरळणी व इतर उपाययोजना राबवावी अशी मागणीचे निवेदन दिले आहे.
नशिराबादकर गेल्या अनेक दिवसांपासून डासांच्या उपद्रवामुळे हैराण झाले आहेत. घराबाहेर, अंगणात किंवा घरातही बसणे कठीण झाले आहे. शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य असून, गटारीतील साचलेले पाणी, संडासचे पाईप आणि डबक्यांमुळे डासांची मोठ्या प्रमाणावर उत्पत्ती होत आहे. यंदा मे महिन्यातच मान्सून सुरू झाल्याने डासांची वाढ लक्षणीय असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
वाकी नदीत साठलेल्या पाण्यामुळे नदीपात्राशेजारील लोकांचे जीवन अक्षरशः मेटाकुटीला आले आहे. तसेच, रिकाम्या प्लॉटमधील वाढलेल्या गवतांमुळेही डासांचा धुमाकूळ सुरू आहे. शहरात एकाच दिवसात ४ डेंग्यूचे रुग्ण आढळल्याने, ही बाब शहरवासीयांच्या आरोग्याशी निगडीत असल्याने डास निर्मूलनाची संपूर्ण जबाबदारी नगरपरिषद प्रशासनाची असल्याचे अर्जदारांनी नमूद केले आहे. सद्यस्थितीत नगरपरिषदेत लोकप्रतिनिधी नसल्याने प्रशासन ढिम्म झाल्याचे दिसून येत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.