जळगावात प्रथमच महिलांसाठी ‘पिंक रिक्षा’ उपक्रम सुरु

pink riksha

 

जळगाव प्रतिनिधी । रोजगार उपलब्ध होण्यासाठी नवीन रिक्षा परवान्यांमध्ये महिलांसाठी पाच टक्के आरक्षण ठेवण्याचा निर्णय परिवहन विभागाने गेल्यावर्षी घेतला होता. त्या शासन निर्णयानुसार महिलांनी रिक्षाचालक व्हावे व लायसन्स, बॅच, परमीट घेवुन रिक्षा व्यवसायात यावे, यासाठी शहरात “पिंक रिक्षा परमीट” (अबोली रिक्षा) हा उपक्रम मराठी प्रतिष्ठानतर्फे सुरू करण्यात आला असून महिलांना रिक्षा चालक ट्रेनिंग सुध्दा दिले जाणार आहे.

मात्र याबाबत अनेक गरजु महिलांना माहिती नाही. येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही यांच्या सहकार्याने मराठी प्रतिष्ठान “पिंक रिक्षा” हा उपक्रम राबवित आहे.

प्रतिष्ठानची भूमिका :-
शहरासह जिल्ह्यातील तरूणी किंवा महिला रिक्षा व्यवसायात येण्यात इच्छुक असतील त्यांना रिक्षा चालवण्याचे ट्रेनिंग देणे, लायसन्स काढण्यास मदत करणे, बॅच, परमीट व नविन रिक्षा घेवुन देण्याकरीता अर्थ पुरवठा करणाऱ्या वित्तीय संस्था यांच्यात समन्वय करून देणे, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील सर्व कागदपत्रांची पुर्तता करून देणे यासाठी सहकार्य करण्यात येणार आहे.

‘पिंक रिक्षा’चा उपयोग :-
“पिंक रिक्षा” महिलांकरीता चांगल्या उत्पन्नाचे साधन होवु शकते. या रिक्षा गुलाबी रंगातच उपलब्ध होणार आहे. तसेच परिवहन विभागातर्फे महिलांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येते. “पिंक रिक्षा” या मुलांना शाळेत घेवुन जाणे, आणणे, महिला प्रवाशांना ने-आण करण्याकरीता सुरक्षित असणार आहे. मुंबई, ठाणे येथे “पिंक रिक्षा” मोठ्या प्रमाणात असुन जळगाव शहरामधील महीलांनी, तरूणींनी या व्यवसायात यावे, असा संकल्प मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. जमील देशपांडे, सचिव विजय वाणी यांनी केले आहे.

नाव नोंदणी मुदत व आवाहन :-
“पिंक रिक्षा” करीता नाव नोंदणी १ डिसेंबर ते १५ डिसेंबर २०१९ पर्यंत होणार असुन यासाठी आवश्यक आधारकार्ड, जन्मतारखेचा दाखला, शाळेचा दाखला, २ पासपोर्ट फोटो असे कागद पत्रे लागणार आहेत. मराठी प्रतिष्ठानचे कार्यालय गणपती नगर तसेच विजय वाणी नविपेठ येथे नाव नोंदवावे असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

Protected Content