हैदराबाद-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | तेलंगणात आठवडाभरापासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे संपूर्ण राज्यात हाहाकार उडाला आहे. तेलंगणात अतिवृष्टी आणि पुराच्या घटनांमुळे नागरिकांना प्रचंड हाल सोसावे लागत आहेत. तेलंगणात आतापर्यंत ५० जणांना आपला जीव गमवावा लागला. अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.
केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही तेलंगणाला भेट देऊन पूरस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी पूरग्रस्त आंध्र प्रदेश आणि तेलंगणाला ३,४४८ कोटी रुपयांची तात्काळ मदत जाहीर केली.
तेलंगणात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे आतापर्यंत ५० जणांचा मृत्यू झाला. ३१ ऑगस्टच्या पुरामुळे तेलंगणातील मीनावलू, पेड्डागोपावरम, मन्नूर आणि कट्टेलरू जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. अतिवृष्टीनंतर सरकारकडून राज्यातील ३३ पैकी २९ जिल्ह्यांना पूरग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले. पूरग्रस्त जिल्ह्यांना मदत कार्यासाठी प्रत्येकी ३ कोटी रुपये देण्यात येत आहेत, असे मुख्य सचिव शांती कुमारी म्हणाल्या. तसेच पूरग्रस्तांच्या कुटुंबीयांना सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. जिल्हाधिका-यांना प्राण गमावलेल्या ५० लोकांची माहिती पाठवण्यास सांगितले आहे.