लडाख अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये भुसावळच्या धावपटूंची पताका

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अतिशय खडतर समजल्या जाणार्‍या लडाख अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये भुसावळच्या धावपटूंनी यशस्वीपणे सहभाग नोंदविला आहे.

खारदुंगलासारख्या जगातील उंच  ठिकाणच्या रस्त्यावर हाडे गोठवणारी थंडी, ऊन , पाऊस व बर्फवारी  या नैसर्गिक आव्हानांचा सामना करीत   अंदाजे ११०००  फूट उंचीवरील खारदुंग गावातून धावत सुरुवात करायची. १७६१८ फुटांपर्यंतचा सुमारे ३२ किमीचा चढाव आणि पुढे सुमारे तेवढाच पण ४० किमीचा उतार. एकूण ७२ किमीचा हा रस्ता एखादा धावपटू  पूर्ण करत असेल तर त्या व्यक्तीसाठी हा एक पराक्रम आहे. हा पराक्रम केलाय भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचे डॉ तुषार पाटील व विजय फिरके यांनी !

डॉ. तुषार पाटील यांनी १३ तास ०२ मिनिटात तर विजय फिरके यांनी १३ तास २७ मिनिटात हे अवघड आव्हान पूर्ण केले. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता ५०% हुन अधिक आहे अशा अवघड मॅरेथॉनमध्ये डॉ चारुलता पाटील यांनी २१ किमी धावून भुसावळ तालुक्यातील लडाख भागात अर्ध मॅरेथॉन पूर्ण करणार्‍या त्या प्रथम महिला धावपटू ठरल्या. यामुळे त्यांच्यावर सर्वत्र विशेष अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

भुसावळातील प्रथम अर्ध मॅरेथॉन पूर्ण करण्याचा बहुमान देखील त्यांच्याच नावावर आहे. ४ वर्षांपूर्वी नवी मुंबई येथील पाम बीच मॅरेथॉनमध्ये त्यांनी ही कामगिरी केली होती. या तिघा धावपटूंसोबत लडाख येथे उपस्थित असलेले प्रा. प्रविण फालक यांनी यावेळी विशेष आनंद व्यक्त केला व धावपटूंचे संघटनेतर्फे कौतुक केले. प्रकृती अस्वास्थामुळे ते या स्पर्धेत सहभागी होऊ शकले नाही. त्यांनी १२२ किमी स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.

भारतातील अत्यंत दुर्गम अशा लडाख जिल्ह्यातील तरुणांना/महिलांना मॅरेथॉनसारख्या साहसी खेळाची ओळख व्हावी, त्यांच्यातील नैसर्गिक गुणांना योग्य वाव मिळावा म्हणून श्री. चेवांग मोटूप गोबा यांनी सुरू केलेल्या उपक्रमाचे हे सातवे वर्ष होते. १२२ किमी, ७२ किमीचे खारदुंगला चॅलेंज, ४२ किमीची पूर्ण मॅरेथॉन, २१ किमीची  अर्ध मॅरेथॉन किंवा ७ किमीची शाळकरी मुलांसाठीची फन रन यापैकी कोणत्याही विभागामध्ये भाग घेणार्‍या धावपटूला आपल्या स्वतःच्या शारीरिक सामर्थ्याचा कस लावून ठरलेले लक्ष्य गाठताना आनंद गगनात मावेनासा न झाला तरच नवल. कारण इतर कोणत्याही शहरातील मॅरेथॉन धावणे आणि लेह येथील मॅरेथॉन धावणे यातील प्रमुख फरक म्हणजे तेथील ऑक्सिजनची कमतरता आणि लहरी हवामान. मुळात ऑक्सिजन कमी असताना, त्यानुसार जुळवून घेत जास्तीत जास्त वेगाने धावत स्पर्धा पूर्ण करणे हे खरोखर आव्हानात्मक आहे.

तेथील स्थानिकांना हा त्रास अर्थातच कमी होतो. परंतु समुद्रकिनार्‍यावरील प्रदेशातून तेथे पोहोचलेल्या धावपटूंना ह्यासाठी नक्कीच विशेष प्रयत्न करावे लागतात. हे थोडेसे कठीण असले तरी अशक्य मात्र नाही. सर्वप्रथम तेथील निसर्गाचा आपल्या मनात  आदर असणे अत्यावश्यक आहे. तसेच तेथे न टाळण्याजोगे विरळ वातावरण असले तरी त्या परिस्थितीशी आपण जुळवून घेऊ शकतो असा आत्मविश्वास आपल्यात असणे जरूरीचे आहे. त्यासाठी लेहमध्ये किमान ८-१० दिवस अगोदर पोहोचणे, सतत थोडे थोडे पाणी/द्रवपदार्थ पित राहणे हे अत्यंत उपयुक्त ठरते. त्यामुळे तेथील शुष्क वातावरणात शरीराचे तापमान नियंत्रित राहते आणि हलकेसे डोके दुखणे, दमछाक होणे या व्यतिरिक्त इतर काही तक्रारी उद्भवत नाहीत. विरळ वातावरणाशी जुळवून घेण्यास शरीरास वेळ लागतो व तेवढा वेळ देणे आवश्यक आहे असे डॉ तुषार पाटील, डॉ चारुलता पाटील व विजय फिरके यांनी सांगितले.

थोडासा आराम, थोडे स्थानिक स्थळदर्शन असे फिरत वातावरणाचा अंदाज घेतला. सुमारे ५०० फूट चढण असलेला लेह पॅलेस पाहताना थोडीशी दमछाक झाली मात्र ते आवश्यक होते. तसेच पायांस सराव असावा म्हणून सुमारे ४ ते ५ किमी धावणे/चालणे हाही व्यायाम करून थोडे शरीरास चालते ठेवले. सभोवताली उंचच उंच डोंगर, त्यांचे सूर्याच्या कोनानुसार दिसणारे रंगबदल, बोचरी थंडी, भुरभुरणारा पाऊस, स्नो-फॉल, तर कधी स्वच्छ निळे आकाश यांच्या सान्निध्यात दररोज सुमारे ८-१० किमीची चढ वा उताराची चाल. ह्या निसर्गभ्रमणात सुमारे १६००० फुटांवरील ‘शँग-ला’ ही खिंडही आम्ही पार केली ज्यामुळे लेहपेक्षाही अधिक विरळ हवामानात काही काळ व्यतीत केल्याचा फायदा आम्हाला पुढे मिळणार होता.  १ आठवडा आधी येऊन  तेथील वातावरणात शारीरिक कष्टाचा सराव तर झालाच पण उल्हसित मने पुढील मॅरेथॉनचे मानसिक आव्हान पेलण्यासही समर्थ झाली शिवाय सातपुड्याच्या कुशीत असलेल्या पालच्या घाटात आम्ही केलेला सराव फळास आला असेही तिघे धावपटू म्हणाले.

उत्कृष्ट आयोजनासाठी देखील ही मॅरेथॉन संस्परनिय ठरलीय कारण वाटेत ठिकठिकाणी मार्गदर्शक फलक,  दर सुमारे ३ किमीनंतर पाण्याचे ठिकाण, इतर पोषक पेये, केळी, इत्यादींची व्यवस्था चोख होती. वाटेतील गावकरी, शाळकरी मुले, सैन्यदलाचे जवान इ. अनेक व्यक्ती आनंदाने टाळ्या वाजवत धावपटूंचा उत्साह वाढवत होते, त्यांना काही हवे/नको ते पाहत होते.आयोजकांचेही सर्व धावपटूंवर लक्ष्य होते व आवश्यक ती वैद्यकीय मदतही पुरवली जात होती.  यशस्वी धावपटूंचे  भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या सर्व धावपटूंतर्फे अभिनंदन करण्यात आले.

Protected Content