दगडफेक प्रकरणातील फरार झालेल्या संशयिताला अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावातील हॉटेल सुमेरसिंग येथे दोन गटात भांडण होवून दगडफेक करून मोबाईल चोरी प्रकरणातील फरार असलेल्या संशयित आरोपीला ममुराबाद गावातून एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. साहील शेख उर्फ धुव्वा सलीम शेख (२७, रा. सुप्रीम कॉलनी) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, १ जुलै रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास  जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावाजवळील हॉटेल सुमेरसिंग येथे दोन गटात भांडण होऊन दोन्ही गटांनी एकमेकांच्या दिशेने दगडफेक केली होती. यात दिनेश सुर्यभान सोनवणे हा जखमी झाला होता तर दिनेश पाटील याचा मोबाईल चोरीला गेला होता. या प्रकरणी पोकॉ गोविदा पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सरकारी कामात अडथळा आणणे, दंगल घडविणे व जबरी चोरीप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यात यापूर्वी १० आरोपींना अटक करण्यात आली होती. या ठिकाणी मोबाईल चोरी करणारा साहील शेख उर्फ धुव्वा सलीम शेख (२७, रा. सुप्रीम कॉलनी) हा पसार होता. तो ममुराबाद येथे असल्याची माहिती पोलिस निरीक्षक  जयपाल हिरे यांना मिळाली होती. त्याला ताब्यात घेण्याविषयी त्यांनी सूचना दिल्या. त्यानुसार पोउनि नीलेश गोसावी, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोलिस नाईक इम्रान सैय्यद, सुधीर सावळे, सचिन पाटील, योगेश बारी, संदीप धनगर यांनी त्याला ममुराबाद येथून रविवारी १७ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता अटक केली. त्यांच्याकडून चोरीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. सोमवारी त्याला जिल्हा न्यायालयात केले असता त्याला न्यायमुर्ती सुर्वणा कुलकर्णी यांनी तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

Protected Content