आधी पत्नीला केले ठार, नंतर पतीने घेतला गळफास

पाचोरा, प्रतिनिधी । तालुक्यातील सावखेडा बु येथे आज पहाटेच्या सुमारास झोपेत असलेल्या पत्नीचा गळा आवळून ठार केल्यानंतर घरातून पळ काढून सावखेडा शिवरातील माजी सरपंचाच्या शेतात पळसाच्या झाडाला पँटने गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की, सावखेडा बु” ता. पाचोरा येथे दि. २८ रोजी गुरुवारी रात्री सतिष धनसिंग परदेशी (वय – ३८), गायत्री सतिष  परदेशी (वय – ३२), ६ वर्षाचा मुलगा व ४ वर्षाच्या मुलीसह संपूर्ण कुटुंब निद्रावस्थेत झोपी गेल्यानंतर शुक्रवारी पहाटे ३ वाजेच्या दरम्यान सतिष धनसिंग परदेशी याने गाढ झोपेत असलेल्या त्याची पत्नी गायत्री सतिष परदेशी हिचा दोन्ही हाताने गळा आवळून ठार केले. नंतर घराबाहेर निघत असतांना आरडाओरड करून पळत असतानांच शेजारच्या घरी राहत असलेल्या त्याचा लहान भाऊ संदिप परदेशी यांच्या सदरची बाब लक्षात आल्यानंतर त्याने सतिषचा पाठलाग करून त्यास पकडून, तू एवढ्या रात्री कुठे जात आहेस व आरडाओरड का करीत आहेस? अशी विचारणा केली असता सतिषने सांगितले की, तू मला काय अडवतो आहेस, मी माझी पत्नी गायत्री हिचा गळा दाबून खून केला आहे. असे सांगताच सतिष त्याच्या म्हणण्यावर विश्वास न ठेवता संदिप ने  घरात जाऊन बघितले असता गायत्री मृत अवस्थेत तर दोघे मुले झोपलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांनंतर सतिष परदेशी याने गावाबाहेर पळत जाऊन येथील माजी सरपंच गोकुळसिंग नथ्थुसिंग परदेशी यांच्या शेतात गेल्यानंतर पळसाच्या झाडावर चढत अंगात असलेल्या स्वेटर व नाईट पँटचे दोन तुकडे करून गळ्या भोवती आवळून गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविली. सकाळी घडलेल्या प्रकारची वार्ता गावभर वाऱ्यासारखी पसरल्यानंतर सतिष याचा शोध सुरू झाला. दरम्यान गावातीलच संजय धना सोनवणे हे सकाळी ९ वाजेच्या दरम्यान स्वतःच्या शेतात जात असतांना त्यांना पळसाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत सतिष धनसिंग परदेशी याचा मृतदेह आढळून आल्याने त्याने गावात पळत जाऊन घटनेची माहिती दिली.

दरम्यान, पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार पत्नीस ठार करून स्वतः गळफास घेणारा इसम काही प्रमाणात वेडसर असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. घटनास्थळी पिंपळगाव (हरे.) पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कृष्णा भोये, सहायक फौजदार विजय माळी, हवालदार दिपकसिंग पाटील, संदिप राजपूत, वाहनचालक दिपक अहिरे यांनी पंचनामा केला. मयत पती व पत्नी यांचे शवविच्छेदन पाचोरा ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित साळुंखे यांनी केले.

शनिवारी होते वडिलांचे अस्थिविसर्जन

सावखेडा येथील सतिष धनसिंग परदेशी व संदिप धनसिंग परदेशी यांचे वडील धनसिंग चिंधा परदेशी यांचे रविवारी दि.२४ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यांचे शनिवारी दि. ३० रोजी सावखेडा येथून अस्थी नासिक येथे नेण्यात येणार होत्या. दरम्यान दुसऱ्या दिवशी अस्थी विसर्जनाचा कार्यक्रम असल्याने सतिष परदेशी व त्याचे कुटुंब दुसऱ्या दिवशी लवकर उठून तयारी करण्यासाठी रोजच्या वेळेपेक्षा लवकर झोपले होते.

पत्नीस मीच मारल्याची भावाजवळ दिली कबुली

सतिष परदेशी याने पहाटे तीन वाजेच्या दरम्यान गायत्री हिचे एका हाताने तोंड दाबून व दुसऱ्या हाताने संपूर्ण ताकदीने गळा आवळून झोपेत असलेल्या मुलांनाही आवाज न येऊ देता ठार केले व घराबाहेर आरडाओरड करून पळत असतांना त्याचा लहान भाऊ संदिप याने अडवून विचारले असता मी माझ्या पत्नीला गळा दाबून ठार केले. अशी कबुली देऊन पुन्हा सैरा वैरा पळत सुटून गावापासून काही अंतरावर असलेल्या शेतातील पळसाच्या झाडाला गळफास घेतला. घटनेप्रकरणी पिंपळगाव (हरे.) पोलिस ठाण्यात खुनाचा व आत्महत्येचा गुन्हा नोंदवून घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक कृष्णा भोये यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय माळी हे करीत आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार सतिष परदेशी हा काही प्रमाणात वेडसर असला तरी पोलिसांच्या चौकशी नंतरच गायत्रीच्या खुनामागील खरे कारण उलगडणार आहे.

Protected Content