जिल्ह्यात पुन्हा गोळीबार : थट्टा मस्करीतून फायरींग झाल्याने तरूण जखमी !


जळगाव/एरंडोल लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |जळगाव जिल्हा पुन्हा गोळीबारने हादरला आहे. एरंडोल तालुक्यातील खेडी कढोली गावात सोमवारी ( ३ नोव्हेंबर) रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास एका धक्कादायक घटनेत गावठी पिस्तूल हातातून चुकून फायर झाल्याने एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. बंदूक हाताळत असतांना ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

​जखमी झालेल्या तरुणाचे नाव सोनू सुभाष बडगुजर (रा. खेडी कढोली, ता. एरंडोल) असे आहे. तर गोळीबार करणारा त्याचा मित्र जितेंद्र किशोर कोळी (रा. खेडी कढोली, ता. एरंडोल) असल्याचे समोर आले आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार, ३ नोव्हेंबर रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास खेडी कढोली गावातील भर चौकात सोनू बडगुजर आणि जितेंद्र कोळी हे मस्करी करत होते. याचवेळी जितेंद्र कोळी याच्या हातात असलेले गावठी पिस्तूल तो हाताळत असताना अचानक ट्रिगर दाबला गेला आणि बंदुकीची गोळी सुटली.

​ही गोळी सोनू बडगुजर याच्या छातीकडील खांद्यावर लागून तेथेच अडकली. गोळी लागल्याने सोनू गंभीर जखमी झाला आणि परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर जखमी सोनूला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे. या घटनेमुळे गावात एकच गोंधळ निर्माण झाला आहे. एरंडोल पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.