
पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील भूषण टिपरे यांनी सामाजिक बांधिलकी जपत कुटीर रुग्णालय, पारोळा येथे २ हजार लिटर क्षमतेची पिण्याच्या पाण्याची टाकी देऊन रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना मोठा दिलासा दिला आहे. रुग्णालयात दीर्घकाळापासून पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या भासत होती. या पार्श्वभूमीवर रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. जिनेंद्र पाटील यांनी ही बाब भूषण टिपरे यांच्या निदर्शनास आणून दिली.
विषय कळताच भूषण टिपरे यांनी कोणताही विलंब न करता आणि कोणतेही औपचारिक शब्द न बोलता तत्काळ २ हजार लिटर क्षमतेची टाकी रुग्णालयात पोहोचवली. त्यांच्या या तत्परतेचे आणि समाजसेवेच्या भावनेचे रुग्णालय प्रशासनाकडून मनःपूर्वक कौतुक करण्यात आले. अधीक्षक डॉ. पाटील यांनी सांगितले की, “या टाकीमुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्ण, त्यांच्या नातेवाइकांसह कर्मचाऱ्यांची पिण्याच्या पाण्याची गरज पूर्ण होईल. हा उपक्रम सामाजिक जबाबदारीचे उत्कृष्ट उदाहरण आहे.”
या प्रसंगी डॉ. राजेश वाल्डे, दीपक सोनार, राजू वानखेडे, ज्ञानेश्वर मराठे, रोहन लोहरे, आशुतोष शेलार आदी उपस्थित होते. रुग्णालयात झालेल्या या उपक्रमामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.
भूषण टिपरे यांच्या या लोकहितकारी कृतीचे स्थानिक नागरिकांकडून भरभरून कौतुक होत असून, त्यांच्या पुढाकारामुळे समाजात सकारात्मक ऊर्जा आणि जनहितासाठी कार्य करण्याची प्रेरणा निर्माण झाल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.



