Home Cities चोपडा हर हर महादेवच्या जयघोषाने दुमदुमली अडावद नगरी ; श्रावणी सोमवारनिमित्त भव्य कावड...

हर हर महादेवच्या जयघोषाने दुमदुमली अडावद नगरी ; श्रावणी सोमवारनिमित्त भव्य कावड यात्रा उत्साहात

0
9

अडावद-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । श्रावणी सोमवारचे औचित्य साधून अडावद शहरात भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले. ‘हर हर महादेव’, ‘बम बम भोले’च्या जयघोषाने संपूर्ण अडावद नगरी भक्तिमय झाली होती. या धार्मिक सोहळ्यात तरुणांसह ज्येष्ठ नागरिक, महिला आणि बालकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. भक्तांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण शहरात दिवसभर उत्साहाचे आणि भक्तीचे वातावरण पाहायला मिळाले.

सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या आणि प्रभू श्रीरामचंद्रांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या श्रीक्षेत्र उनपदेव येथून श्रावणातील पहिल्या सोमवारी पवित्र तीर्थ आणण्यासाठी या कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांनी उनपदेव येथील पवित्र गरम पाण्याचे तीर्थ कावडीत भरून घेतले आणि तेथून पायी अडावदकडे प्रस्थान केले. धार्मिक श्रद्धा आणि उत्साहाने सहभागी झालेल्या भाविकांमुळे यात्रेला विशेष स्वरूप प्राप्त झाले. अडावद येथे पवित्र तीर्थ पोहोचल्यानंतर ते शहरातील जागृत देवस्थान असलेल्या जागेश्वर जीर्णोद्धार मंदिर, हरेश्वर मंदिर आणि कुंदकेश्वर महादेव मंदिर येथे नेण्यात आले. या तिन्ही ऐतिहासिक आणि जागृत मंदिरांमधील शिवलिंगावर भाविकांच्या उपस्थितीत भक्तिभावाने जलाभिषेक करण्यात आला. त्यानंतर महापूजेचे आयोजन करण्यात आले. यावेळी मंदिर परिसरात हर हर महादेवच्या जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले होते. कावड यात्रेत सहभागी झालेल्या भाविकांनी धार्मिक उत्साहासोबतच शिस्त आणि भक्तीचे दर्शन घडविले. मार्गावर नागरिकांनी भाविकांचे स्वागत केले. विविध ठिकाणी यात्रेचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. श्रावण महिन्यात भगवान महादेवाच्या भक्तीला विशेष महत्त्व असल्याने या कावड यात्रेला परिसरातील भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी अडावद पोलीस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी यात्रेच्या मार्गावर आवश्यक नियोजन केले. पोलिसांच्या दक्षतेमुळे कावड यात्रा शांततेत, सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. या भव्य धार्मिक सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी अडावदमधील ग्रामस्थ, तरुण मंडळे आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. भाविकांच्या सहभागामुळे आणि जयघोषामुळे अडावद नगरीला जणू शिवभक्तीचे स्वरूप प्राप्त झाले होते. श्रावणी सोमवारनिमित्त पार पडलेल्या या कावड यात्रेने धार्मिक एकोप्याचे आणि भक्तिभावाचे दर्शन घडवून आणले.


Protected Content

Play sound