
रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी दिवसेंदिवस रंगत चालली असून प्रभाग क्रमांक १२ मध्ये भाजपाकडून तगडी दावेदारी समोर आली आहे. भाजपाचे शहराध्यक्ष आणि रावेर पिपल्स बँकेचे चेअरमन दिलीप हिरामण पाटील यांनी या प्रभागातून निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. “पक्षाने विश्वास ठेवून उमेदवारी दिल्यास मी या प्रभागातून निवडणूक लढणार आहे,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
दिलीप पाटील हे रावेर शहरातील ओळखले जाणारे प्रभावी व्यक्तिमत्त्व असून त्यांनी अनेक सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रांत कार्य केले आहे. भाजपात त्यांचे स्थान वजनदार असून शहरातील कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा चांगला दबदबा आहे. त्यांच्या दावेदारीमुळे प्रभाग क्रमांक १२ मध्ये राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रभागातून काही अन्य इच्छुकही पुढे येत असले तरी पाटील यांच्या नावाने पक्षात चांगलीच चर्चा रंगली आहे.
प्रभाग क्रमांक १२ हा मुख्यतः मराठा बहुल मतदारसंघ असून दिलीप पाटील हे स्वतः मराठा समाजातून येतात. त्यामुळे या भागात त्यांची सामाजिक पकड आणि जनसंपर्क अधिक मजबूत असल्याचे स्थानिक राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. मतदारांशी थेट संवाद आणि सातत्यपूर्ण संपर्क या त्यांच्या कार्यशैलीमुळे त्यांना स्थानिकांचा विश्वास प्राप्त झाल्याचे मानले जाते.
या प्रभागात व्ही. एस. नाईक परिसर, स्वामी समर्थ केंद्र परिसर, विद्यानगर, सोनू पाटील नगर, शनी मंदिर कॉलनी, मराठा मंगल कार्यालय परिसर, आदर्श नगर, रेल्वे स्टेशन परिसर, स्टेशन रोड आणि शिक्षक कॉलनी यांचा समावेश आहे. या सर्व भागांत पाटील यांनी गेल्या काही वर्षांत विविध सामाजिक उपक्रम आणि नागरिक संपर्काद्वारे आपली उपस्थिती ठळकपणे दर्शवली आहे.
नगरपालिका निवडणुकीची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, त्याआधीच प्रभाग १२ मध्ये भाजपाच्या राजकारणाला वेग आला आहे. दिलीप पाटील यांच्या इच्छुकतेमुळे पक्षात चैतन्य निर्माण झाले असून, या निवडणुकीत त्यांच्या दावेदारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



