मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मंत्रीमंडळ विस्तारातील शपथविधीमध्ये बाळासाहेबांना विसरल्यानंतर दोन दिवसांनी शिंदे गटाला बाळासाहेब ठाकरे आठवले असून आज सर्व मंत्र्यांनी त्यांच्या स्मारकावर जाऊन अभिवादन केले.
शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार परवा पार पडला. शिंदे गटाकडून एकूण ९ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. शपथ घेतांना एकाही मंत्र्यांना बाळासाहेब ठाकरे यांचे स्मरण केले नाही. तर, शपथ घेतल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दादर येथील शिवतीर्थ मैदानावर वंदन करण्यासाठी कोणताही मंत्री पोहोचला नाही. त्यामुळे मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी टीका केली होती. अखेर आज शिंदे गटाचे मंत्री बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी पोहचले.
शिंदे गटाचे मंत्री ना. गुलाबराव पाटील, दीपक केसरकर, संजय राठोड, शंभूराजे देसाई, यांच्यासह इतर मंत्री आणि पदाधिकार्यांनी शिवतीर्थावर जाऊन बाळासाहेबांना अभिवादन केले. आपण बाळासाहेबांचाच विचार पुढे घेऊन जात असल्याचे पुनरूच्चार याप्रसंगी दीपक केसरकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना केला.