मुंबै बँकेत दरेकरांना धक्का : शिवसेना, राष्ट्रवादीची खेळी

मुंबई प्रतिनिधी | मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजेच मुंबै बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन भाजप उमेदवार आ. प्रसाद लाड यांचा पराभव करून या बँकेवर गेल्या दशकापासून एकछत्री वर्चस्व असणार्‍या विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना जोरदार धक्का दिला आहे.

आज मुंबै बँकेच्या अध्यक्षपदाची निवड झाली. यात महाविकास आघाडीचे सिद्धार्थ कांबळे हे विजयी झाले असून त्यांनी भाजपच्या प्रसाद लाड यांचा पराभव केला आहे. राष्ट्रवादी कॉंगेसचे सिद्धार्थ कांबळे यांना ११ मते मिळाली तर भाजपच्या प्रसाद लाड यांना ९ मतं मिळाली आहेत. तर यउपाध्यक्षपदाच्या दोन्ही उमेदवारांना समान मतं मिळाली आहेत.

मुंबई जिल्हा बँक अध्यक्षपदाच्या निवडणुकीआधी आदित्य ठाकरे यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या संचालकांची बैठक बोलावली होती. या बैठकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्रित व्यूहरचना करत भाजपच्या प्रवीण दरेकरांचं वर्चस्व मोडून काढण्याचं ठरलं. त्याच पद्धतीने नियोजन करत आता सिद्धार्थ कांबळेंना अध्यक्षपदी बसवण्यात आलं आहे.

सिद्धार्थ कांबळे हे राष्ट्रवादीचे नेते असून त्यांनीच गेली अनेक वर्षे राष्ट्रवादीची कमान सांभाळली आहे. त्यांच्याच कामाचा अनुभव या निवडणुकीत कामाला आल्याचं सांगण्यात आलं आहे. प्रवीण दरेकर यांच्याकडे मुंबै बँकेची प्रदीर्घ काळापासून धुरा असून यंदा देखील त्यांच्याच नेतृत्वाखालील पॅनलने विजय संपादन केला होता. मात्र अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीने त्यांना पध्दतशीरपणे गेम केल्याचे निकालातून दिसून आले आहे.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.