यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल शहर आणि परिसरातील कोरपावली, महेलखेडी, दहिगाव आदी गावांतील शेतकरी बांधवांच्या सोयीसाठी यावल ते कोरपावली या जुन्या रस्त्याचे डांबरीकरण करून दुरुस्ती करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबतचे एक निवेदन यावल-रावेरचे आमदार अमोल जावळे यांना नुकतेच सादर करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, यावल ते कोरपावली हा जुना रस्ता अनेक वर्षांपासून नादुरुस्त आहे. या मार्गावर परिसरातील अनेक शेतकऱ्यांची शेती असून, शेतमालाची वाहतूक करण्यासाठी याच रस्त्याचा वापर केला जातो. मात्र, रस्त्यावर मोठे खड्डे पडल्यामुळे आणि तो पूर्णपणे नादुरुस्त झाल्यामुळे मोठे वाहनधारक या रस्त्यावर येण्यास कचरतात. याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या वाहतुकीवर होत आहे. वेळेवर वाहतूक न झाल्यामुळे शेतमालाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हा रस्ता नव्याने डांबरीकरण करण्याची आग्रही मागणी केली आहे.
हे निवेदन भालोद येथे आमदार अमोल जावळे यांच्या निवासस्थानी जाऊन शेतकरी जगदीश कवडीवाले, नितीन भोईटे, प्रदीपसिंग पाटील यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी दिले. निवेदनादरम्यान संजय बारी, दीपक पाटील, विलास पंडित, अर्जुन बारी आदी शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर आमदार अमोल जावळे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांनी सांगितले की, या रस्त्याच्या दुरुस्तीसंदर्भात ते यावलच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तातडीने माहिती घेतील. तसेच, या रस्त्याचे डांबरीकरण कोणत्या योजनेतून करता येऊ शकते, याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करून माहिती घेतली जाईल. हा रस्ता शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा असून, त्याचे तात्काळ डांबरीकरण करण्यासाठी आपण जातीने लक्ष घालून प्रयत्न करू, असे आश्वासन आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांनी निवेदनकर्त्या शेतकऱ्यांना दिले. आमदारांच्या या आश्वासनामुळे शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.