यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांनी यावल पंचायत समितीला भेट देऊन तेथील विविध विकासकामांचा आढावा घेतला. या भेटीदरम्यान त्यांनी गटविकास अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांशी संवाद साधून नागरिकांच्या समस्यांची जाणीव करून दिली.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. मंजुश्री गायकवाड (बोरसे) यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून तयार केलेल्या १०० दिवसांच्या कृती आराखड्याच्या अंमलबजावणीबाबत माहिती जाणून घेतली. त्यांनी यावल पंचायत समितीची इमारत आणि इतर शासकीय कार्यालयांना भेटी देऊन पाहणी केली आणि पंचायत प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या.
या भेटीदरम्यान उपस्थित पत्रकारांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांचे लक्ष वेधले. त्यांनी तालुक्यातील ग्रामीण भागातून आपल्या कामांसाठी पंचायत समितीमध्ये येणाऱ्या नागरिकांसाठी बसण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली. तसेच, अधिकारी वर्ग निवासस्थानाअभावी मुख्यालयात राहत नसल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची माहिती दिली.
या गंभीर समस्यांची दखल घेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांनी तात्काळ गटविकास अधिकाऱ्यांना या दोन्ही प्रश्नांकडे लक्ष देऊन तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यांनी नागरिकांसाठी आसन व्यवस्था उपलब्ध करून देण्यासोबतच अधिकाऱ्यांसाठी निवासस्थानाची सोय करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे सांगितले. या भेटीच्या वेळी पंचायत समितीचे हबीब तडवी, गटशिक्षण अधिकारी विश्वनाथ धनके यांच्यासह पंचायत समिती आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या समस्यांची दखल घेतल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. लवकरच या समस्यांवर तोडगा निघेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.