Home पर्यावरण कोरपावलीत जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा ; २०० वृक्षलागवडीतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

कोरपावलीत जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा ; २०० वृक्षलागवडीतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

0
12

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील कोरपावली ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक आदिवासी दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. आदिवासी समाजातील थोर समाजसेवक व जननायकांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासोबतच गावात तब्बल २०० वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. ग्रामपंचायतचे सरपंच तथा प्रशासक विलास नारायण अडकमोल यांच्या हस्ते कार्यक्रमाला सुरुवात झाली.

जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी समाजातील थोर महापुरुष तंट्या मामा, ख्वाजा नाईक आणि बिरसा मुंडा यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. सरपंच तथा प्रशासक विलास नारायण अडकमोल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राकेश फेगडे आणि मुनाफ तडवी यांच्या हस्ते प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी उपस्थितांनी आदिवासी समाजाच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण करत महापुरुषांच्या कार्याला अभिवादन केले.

यानंतर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फलकाला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच गावातील मुख्य चौकातील हजरत पीर गैबनशाह बाबा यांच्या दर्ग्यावर चादर चढवण्यात आली. सामाजिक सलोखा आणि सर्वधर्मीय ऐक्याचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून गावात विविध ठिकाणी तब्बल २०० वृक्षांची लागवड करण्यात आली. मराठी शाळेचा परिसर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फलकाजवळ तसेच गावातील नागरिकांना वैयक्तिकरित्या वृक्ष देऊन लागवड करण्यात आली. केवळ वृक्षारोपण न करता लागवड केलेल्या वृक्षांचे नियमित संवर्धन आणि संगोपन करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

आदिवासी दिनाच्या निमित्ताने सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबवून समाजाच्या सांस्कृतिक वारशासोबतच निसर्ग संवर्धनालाही महत्त्व देण्यात आले. वृक्षलागवडीमुळे गावातील हिरवाई वाढण्यास मदत होणार असून, भविष्यात या वृक्षांचे संगोपन करण्याची जबाबदारी ग्रामस्थांनी स्वीकारावी, असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले. या कार्यक्रमास ग्रामपंचायतचे प्रशासक तथा सरपंच विलास अडकमोल, उपसरपंच हमीदा पटेल, यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा संचालक राकेश वसंत फेगडे, ग्रामपंचायत सदस्य सत्तार तडवी, अफरोज पटेल, ग्रामपंचायत अधिकारी ऋषीकेश देवकर, समाजसेवक मुक्तार पटेल, आदिवासी समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते मुनाफ तडवी यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी, प्रतिष्ठित नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound