अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथे आज, शनिवार ५ एप्रिलपासून भवानी मातेच्या यात्रोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे. दरवर्षीप्रमाणे चैत्र शुद्ध अष्टमीला भरणारा हा यात्रोत्सव अनेक वर्षांची परंपरा जतन करत आहे. यात्रेदरम्यान भाविक आपल्या मनोकामना पूर्ण झाल्याबद्दल देवीला नवस फेडण्यासाठी मोठ्या संख्येने येत आहेत.
कळमसरे गावाच्या दक्षिणेला लहान भवानी मातेचे मंदिर, तर गावापासून दोन किलोमीटर अंतरावर शहापूर रस्त्यालगत मोठ्या भवानी मातेचे भव्य मंदिर आहे. सुमारे शंभर वर्षांपूर्वी या दोन्ही मंदिरांची स्थापना झाली असल्याचे सांगितले जाते. मोठी भवानी आणि लहान भवानी या दोन बहिणी असून, हे दोन्ही देवस्थान जागृत असल्याची मान्यता गावकऱ्यांमध्ये आणि भाविकांमध्ये आहे. या यात्रोत्सवात गाव तसेच बाहेरगावांहून आलेले भाविक वरण-बट्टीचा नवस मोठ्या श्रद्धेने फेडतात. अनेक भाविकांनी आपल्या मनोकामना पूर्ण झाल्याचे अनुभव सांगितले आहेत.
यात्रोत्सवाची सुरुवात मोठ्या भवानी मातेच्या मंदिरावर सर्वात आधी मान देऊन होते. पहाटे मोठी भवानी मातेचे भक्त दंगल बडगुजर हे ध्वजारोहण करतात. त्याच परंपरेनुसार लहान भवानी मातेच्या मंदिरावर श्रावण चौधरी यांच्या कुटुंबाकडून ध्वज चढविला जातो. यानंतर महाआरती होते आणि दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळते. लहान भवानी मातेचे भक्त कै. गुलाब महाजन हे वर्षभर या मंदिराची पूजा-अर्चा करत होते. त्यांच्या पश्चात त्यांचे लहान बंधू रामलाल महाजन ही वडिलोपार्जित सेवा निस्वार्थपणे पुढे चालवत आहेत.
भवानी माता हे कळमसरे गावचे ग्रामदैवत असल्याने, या यात्रोत्सवासाठी बाहेरगावी असलेले अनेक भाविक खास करून गावात येतात. अष्टमीच्या दिवशी गावातील माळी समाजाच्या सैंदाणे परिवाराची कुलदेवता इंदासीमाता आणि नवमीच्या दिवशी माळी समाजाच्या वाघ परिवाराची कुलदैवत इंदासी माता यांच्या स्वतंत्र मंदिरांमध्ये पूजा व धार्मिक विधी पार पडतात. गावात नवसाच्या माना मोठ्या प्रमाणात असल्याने प्रत्येक चौकात नवस फेडणाऱ्यांची गर्दी दिसून येते. यामुळे गावात पाहुण्यांची रेलचेल असते.
या यात्रोत्सवात लहान मुलांसाठी विविध खेळणीची दुकाने आणि मनोरंजनासाठी पाळणे दाखल झाले आहेत. रात्री भाविकांच्या मनोरंजनासाठी लोकनाट्य तमाशाचे आयोजनही करण्यात आले आहे. दोन्ही भवानी माता मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. कळमसरे ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मंदिरांपर्यंत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी विशेष व्यवस्था केली आहे. कळमसरे ग्रामस्थांनी परिसरातील भाविकांना या यात्रोत्सवात मोठ्या संख्येने उपस्थित राहून यात्रेची शोभा वाढवावी, असे आवाहन केले आहे.