दहीगावातील पाणी समस्या कायम; ग्रामस्थांची नाराजी, सरपंचांकडे तक्रार दाखल

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील दहीगाव ग्रामपंचायतीच्या वार्ड क्रमांक १ मध्ये गेल्या दहा ते बारा महिन्यांपासून पाणीपुरवठ्याची समस्या गंभीर बनली आहे. यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी ग्रामपंचायतीच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या संदर्भात ग्रामस्थांनी सरपंच आणि यावल पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दहीगाव ग्रामपंचायतीच्या वार्ड क्रमांक १ मध्ये मागील जवळपास वर्षभरापासून पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. याबाबत सरपंच, उपसरपंच आणि इतर सदस्यांना अनेक वेळा तोंडी तसेच लेखी स्वरूपात तक्रारी करण्यात आल्या. मात्र, दुर्दैवाने या तक्रारींची कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही.

पाणीपुरवठा पाईपलाईनसाठी खोदकाम करून ठेवण्यात आले आहे, परंतु त्यावर अद्याप कोणतेही काम पूर्ण झालेले नाही. यामुळे खोदलेले खड्डे धोकादायक बनले असून, रात्रीच्या वेळी एखाद्या नागरिकाचा अपघात होऊन तो जखमी होण्याची शक्यता आहे. या गंभीर बाबीकडे ग्रामपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या तक्रार निवेदनावर बाळू भीमराव महाजन, भिकन विश्राम पाटील, जनार्दन बाविस्कर, बाळू धनगर, सुकलाल सोनार, संदीप तेली, हिम्मत धनगर, चंद्रभान महेश श्री, अनिता धनगर, सरला धनगर, विलास चौधरी, दगडू महाजन, चटाबाई पाटील, लक्ष्मण महाजन, संजय महाजन, देविदास तेली आदी ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

दरम्यान, या संदर्भात दहीगावचे सरपंच अजय अडकमोल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, वार्ड क्रमांक १ मधील पाणीपुरवठ्याची समस्या सोडवण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. नवीन वाल बसवून प्रत्येक नागरिकाला व्यवस्थित पाणीपुरवठा होईल, अशी व्यवस्था केली जात आहे. मात्र, काही नागरिक या कामात अडथळा निर्माण करत आहेत. तरीही, यावर योग्य तोडगा काढून लवकरच, एक-दोन दिवसात पाणीपुरवठ्याची समस्या सोडवली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

दहीगावातील वार्ड क्रमांक १ मधील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी गैरसोय सहन करावी लागत आहे. वर्षभरापासून तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना न झाल्याने नागरिकांमध्ये असंतोष आहे. आता सरपंचांनी लवकरच पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले असले, तरी नागरिक प्रत्यक्ष कार्यवाहीची प्रतीक्षा करत आहेत. पाणी ही मूलभूत गरज असून, ती तातडीने पुरवली जावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Protected Content