
फैजपूर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पारंपरिक शेती, हवामानातील अनिश्चितता, रासायनिक खतांचा अवाजवी वापर व तंत्रज्ञानाचा अभाव यामुळे आजचा शेतकरी अडचणीत सापडला आहे. मात्र, शेतकरी जर उद्योजकीय दृष्टीकोन स्वीकारून शेतीला उद्योगाशी जोडले, तर त्यांची समृद्धी सहज शक्य आहे, असे प्रतिपादन कुर्बान तडवी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव यांनी केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘शेतकरी तंत्रज्ञान साक्षरता कार्यशाळा’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. त्यांनी शेतकऱ्यांना पारंपरिक अल्पसंतुष्ट मानसिकतेतून बाहेर येऊन पुरवठा साखळीत सक्रीय सहभाग घेण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर शेतीला आर्थिकदृष्ट्या फायदेशीर बनवण्यासाठी तंत्रज्ञानाचा योग्य वापर, शाश्वतता आणि नविन प्रयोगशीलता यावर भर देण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. सुधाकर काशिनाथ चौधरी होते. व्यासपीठावर धनंजय चौधरी, प्रा. किशोर चौधरी, डॉ. जी.पी. पाटील, अजित पाटील, सचिन गायकवाड, डॉ. महेश महाजन, डॉ. धीरज नेहते, प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे, प्रा. डॉ. पी.डी. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्राचार्य डॉ. वाघुळदे यांनी ग्रामीण शेतकऱ्यांच्या समस्यांचा उल्लेख करून अशा कार्यशाळा कशा उपयुक्त ठरतात, हे स्पष्ट केले. त्यांनी स्व. बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या कार्याचे स्मरण करत जल व्यवस्थापन व शाश्वत शेतीच्या दिशेने प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.
प्रथम सत्रात सचिन गायकवाड यांनी शेतकऱ्यांनी सरकारच्या योजना — जसे की शेततळे, गोदाम योजना, व महाविस्तार अॅप — यांचा लाभ घ्यावा, असे सांगितले. ‘जय जवान, जय किसान, जय विज्ञान आणि जय अनुसंधान’ या चतुरसूत्रीचा आधार घेत त्यांनी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
द्वितीय सत्रात डॉ. धीरज नेहते (कृषी विज्ञान केंद्र, पाल) यांनी ‘निर्यातक्षम केळी उत्पादन तंत्रज्ञान’ या विषयावर मार्गदर्शन करताना पनामा, करपा रोगांचे व्यवस्थापन, सेंद्रिय पोषकद्रव्यांचा वापर, कोल्ड स्टोरेजचे महत्त्व, आणि निर्यातीसाठी आवश्यक असणारे आंतरराष्ट्रीय निकष यावर सविस्तर माहिती दिली.
अध्यक्षीय समारोपात डॉ. सुधाकर चौधरी यांनी विद्यापीठ, महाविद्यालय आणि कृषी क्षेत्र यांच्यातील समन्वयातून अशी कार्यशाळा प्रभावी ठरत असून, समाज व देशाच्या प्रगतीसाठी अशा स्तुत्य उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.
धनंजय चौधरी यांनी शासनाच्या विविध योजना प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सक्रिय समन्वय आवश्यक असल्याचे सांगितले. त्यांनी या कार्यशाळेच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल होण्याची अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॅ. डॉ. राजेंद्र राजपूत यांनी केले, तर आभार प्रा. डॉ. निखिल वायकोळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिरीषदादा चौधरी, प्राचार्य वाघुळदे, सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.



