
फैजपूर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । धनाजी नाना महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाने नुकत्याच घडलेल्या तीन उल्लेखनीय यशांमुळे आपला शैक्षणिक आणि व्यावसायिक लौकिक अधिकच बळकट केला आहे. माजी विद्यार्थी निरज नंदाने यांची “वाइल्डलाईफ बायोलॉजिस्ट” म्हणून जळगाव येथे नियुक्ती झाली असून गौरव शिंदे यांची प्रतिष्ठित वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, देहरादून येथे निवड झाली आहे. त्याचबरोबर कु. उज्वला ठोसरे यांनी महाराष्ट्र सेट परीक्षेत यश संपादन केल्याने विभागाचा सन्मान द्विगुणित झाला आहे.
या सर्व विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे यांनी भूषविले. त्यांनी अध्यक्षीय भाषणात प्राणीशास्त्र विभागाने मिळवलेल्या या यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व्यक्त केले आणि विद्यार्थ्यांना भविष्यासाठी मार्गदर्शन करत प्रोत्साहन दिले. प्राणीशास्त्र विषयाची वाढती व्याप्ती आणि करिअरमधील संधी यांची त्यांनी सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राणीशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. सविता अजित कलवले यांनी केले. त्यांनी विभागातील गुणवत्तापूर्ण अध्यापन व मार्गदर्शनामुळे हे यश शक्य झाल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन स्नेहल महाजन यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. स्वप्निल शाह यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. किरण फेगडे, प्रा. ललिता पाटील, प्रा. उत्कर्षा कोल्हे, प्रा. कविता इंगळे यांनी सक्रिय सहभाग घेतला. याशिवाय शिक्षकेतर कर्मचारी दिलीप मेढे व गणेश चव्हाण यांचे योगदानही उल्लेखनीय राहिले. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावली होती, ज्यामुळे परिसरात एक सकारात्मक शैक्षणिक वातावरण निर्माण झाले.
या यशामुळे धनाजी नाना महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाने केवळ अकादमिक गुणवत्ता सिद्ध केली नाही, तर विद्यार्थ्यांच्या करिअर घडविण्यातही महत्त्वाची भूमिका बजावल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.



