शेतकरी नेते रविकांत तुपकरांची पाचोऱ्यात भेट; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मंथन !


पाचोरा-लाईव्‍ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष रविकांत तुपकर यांनी शनिवारी पाचोरा शहराला भेट दिली. येथील सत्यम इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित कार्यक्रमात जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यासाठी संघटनेच्या नवनियुक्त जिल्हाध्यक्षांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. यासोबतच खान्देशातील शेतकऱ्यांच्या विविध ज्वलंत समस्यांवर सखोल विचारमंथन झाले.

कार्यक्रमापूर्वी, उ.बा.ठा. शिवसेनेच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी यांनी निर्मल सिड्स येथे रविकांत तुपकर आणि इतर शेतकरी नेत्यांचा सत्कार केला. त्यानंतर सर्वजण सत्यम इन्स्टिट्यूट येथे बैठकीसाठी दाखल झाले. महाराष्ट्र राज्य कृषी उत्पादक संघटनेचे अध्यक्ष निळकंठ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

बैठकीच्या सुरुवातीला आलेल्या पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर जळगाव विभागातील गेल्या २७ वर्षांपासून बंद असलेला एरंडोल येथील वसंत सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याच्या मागणीवर विशेष चर्चा झाली. यासाठी संघटनेने शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करावी, असे आवाहन करण्यात आले. याव्यतिरिक्त कापूस आणि सोयाबीनला योग्य हमीभाव मिळावा, तसेच शेतकऱ्यांच्या मुलांच्या विवाहसंबंधी समस्यांवरही यावेळी विचारविनिमय करण्यात आला.

या महत्त्वपूर्ण बैठकीत रविकांत तुपकर यांनी जळगाव जिल्हाध्यक्षपदी दिलीप पाटील आणि नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी योगेश पाटील यांच्या नावाची घोषणा केली व त्यांना नियुक्तीपत्रे प्रदान केली. यावेळी बोलताना तुपकर म्हणाले की, विदर्भ आणि खान्देशातील शेतकऱ्यांचे प्रमुख प्रश्न कापूस आणि सोयाबीनचे आहेत. या समस्यांवर एकत्रितपणे काम केल्यास निश्चित यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यासाठी लवकरच जळगाव येथे एका मोठ्या शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी जळगाव जागृत जनमंचचे शिवराम पाटील यांनी समारोपाचे भाषण केले.

या बैठकीला महाराष्ट्र राज्य कृषी उत्पादक संघटनेचे अध्यक्ष निळकंठ पाटील, उपाध्यक्ष गुलाब पाटील, सचिव कृष्णा वानखेडे, क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ईश्वर पाटील, अनिल पवार, शेतकरी नेते दगा पाटील (धुळे), ईश्वर पाटील (उपसरपंच, गाळण बुद्रुक), विजय पाटील (वडगाव बुद्रुक, अध्यक्ष किसान मोर्चा), मनोज रमेश पाटील (दहिगाव संत, उपाध्यक्ष, किसान मोर्चा), निरज पाटील (वाघूलखेडा), संतोष पाटील (आंबेवडगाव), योगेश पाटील, वैभव वानखेडे आणि राकेश वाघ (जळगाव) यांच्यासह अनेक प्रमुख शेतकरी नेते उपस्थित होते.