रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर-दोधे रस्त्यावर आज सकाळच्या सुमारास मोठी कारवाई करण्यात आली. तहसीलदार बंडू कापसे यांनी अवैध वाळू वाहतूक करणारी एक ट्रॅक्टर ट्रॉली थांबवून जप्त केली. या कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या वॉश आऊट मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईने महसूल विभागात चांगलीच खळबळ उडाली आहे. कारण, तहसीलदारांना अवैध वाळू वाहतूक करणारे वाहन सापडत असताना, त्याच भागातील संबंधित तलाठी आणि मंडळ अधिकारी मात्र याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करत असल्याचे उघड झाले आहे. तालुक्यातील केवळ दोन-तीन प्रामाणिक अधिकाऱ्यांचा अपवाद वगळता, बहुतेक तलाठी आणि मंडळ अधिकारी त्यांच्या कामाप्रती गंभीर नसल्याची टीका आता जोर धरू लागली आहे. त्यांच्या कार्यक्षेत्रातून मोठ्या प्रमाणात विनापरवाना वाळू आणि मातीची वाहतूक सर्रासपणे सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
आज सकाळी तहसीलदार बंडू कापसे यांच्यासोबत तलाठी स्वप्नील परदेशी आणि भगत यांनी संयुक्तपणे रावेरकडे येणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलींना अडवून त्यातील वाळू जप्त केली. या अचानक झालेल्या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, वाळू तस्करांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान, रावेर तालुक्यातील जागरूक नागरिकांनी या गंभीर परिस्थितीची दखल घेत थेट जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे धाव घेतली आहे. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एक निवेदन सादर करून मागणी केली आहे की, जे तलाठी आणि मंडळ अधिकारी आपल्या जबाबदाऱ्या योग्य प्रकारे पार पाडत नाहीत, अशा निष्क्रीय कर्मचाऱ्यांची तातडीने तालुक्याबाहेर बदली करण्यात यावी.