राष्ट्रीय लोक अदालतीत ४५२१ प्रकरणांचा निपटारा; १२ कोटींहून अधिक रकमेची वसुली


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशानुसार दिनांक १० मे २०२५ रोजी जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले. जिल्हा न्यायालयासह सर्व तालुका न्यायालये, कौटुंबिक, औद्योगिक, कामगार, सहकार न्यायालये व जिल्हा ग्राहक तक्रार आयोगामध्ये ही लोक अदालत एकाचवेळी पार पडली.

या लोक अदालतीत दाखलपूर्व आणि न्यायालयीन अशा एकूण ४५२१ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. त्यामध्ये ३८२८ दाखलपूर्व तर ६९३ प्रलंबित प्रकरणे होती. या माध्यमातून १२ कोटी ५० लाख ५१ हजार ९२६.५० रुपये इतकी मोठी रक्कम वसूल करण्यात आली. याशिवाय, ५ मे ते ९ मे दरम्यान राबविण्यात आलेल्या स्पेशल ड्राईव्ह अंतर्गतही २७० प्रकरणे निकाली काढण्यात आली.

या उपक्रमास मा. श्री एम.क्यु.एस.एम. शेख, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व न्यायाधीश, वकीलवृंद, न्यायालयीन कर्मचारी आणि दोन्ही पक्षकारांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

लोक अदालतीदरम्यान अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये बी. एस. वावरे (जिल्हा न्यायाधीश-२), एस. जी. काबरा (जिल्हा सरकारी अभियोक्ता), अॅड. सुनिल जी. चोरडिया, छाया सपके, एस. पी. सय्यद, अॅड. रमाकांत पाटील, अॅड. अनिल पाटील, अॅड. कल्याण पाटील यांचा समावेश होता. विविध न्यायालयांचे पॅनल न्यायाधीश व अधिकाऱ्यांचे देखील मोलाचे योगदान लाभले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक जे. ओ. माळी व त्यांच्या टीममधील आर. के. पाटील, प्रमोद ठाकरे, जयश्री पाटील, संतोष तायडे, सागर चौधरी, पवन पाटील, आकाश थोरात, राहुल साळुंखे, प्रकाश काजळे, जावेद पटेल, सचिन पवार व जितेंद्र भोळे यांनी विशेष मेहनत घेतली.