शेतकरी हवालदिल : रोगामुळे केळी पिक उपटून फेकली !

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर व मुक्ताईनगर तालुक्याच्या पाठोपाठ आता यावल तालुक्यातील देखील केळी बागांवर ग्रीन बेल्टमध्ये कुकुंबर मोझॅक व्हायरस (सीएमव्ही) रोगाने या वर्षीही पुन्हा डोके वर काढल्याने केळीची रोपे उपटून फेकण्याची वेळ केळी उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

या रोगावर सध्या कोणत्याही प्रकारचे रोग प्रतिबंधक औषध नसल्यामुळे नाईलाजास्तव शेतकरी बांधवांना संपूर्ण केळी बागा उपटून फेकत त्याची विल्हेवाट लावण्याची खबरदारी देखील शेतकऱ्यांना घ्यावी लागत आहे.

मागील काही दिवसापासुन शेतकऱ्यांच्या गुरांवर लंपी स्किन डिसीज या संसर्गजन्य आजारामुळे शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत असतांना रावेर, मुक्ताईनगर तालुक्यापाठोपाठ आता यावल तालुक्यात या विषाणूजन्य रोगाने थैमान घातल्यामुळे केळी उत्पादक शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. विशेष म्हणजे टिश्यूकल्चर केळी रोपांना या विषाणूजन्य रोगाची लागण लवकर होत असून महागडी रोपे उपटून फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. यावल तालुक्यात कायमस्वरूपी सक्षम असे कृषी अधिकारी नसल्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांना योग्य उत्तर देणारे नसल्याने कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मात्र शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये कृषि विभागाविषयी प्रचंड रोष आहे.

येथील गोपाल बाबुराव बारी यांनी आपल्या शेतातील टिश्यूकल्चरची सुमारे ४५०० रोपे उपटून फेकून द्यावी लागली. या महागडया रोपांवर आतापर्यंत अडीच लाख रुपये खर्च झाला होता. बारी यांचे प्रमाणेच तालुक्यात सुमारे ५० हेक्टरपेक्षा अधिक प्रमाणावर केळी बागांवर विशेषतः टिश्यूकल्चर रोपांवर या रोगाचे प्रमाण जास्त आहे. जूलै, ऑगष्ट मध्ये पेरणी झालेल्या मृग बागांवर हा रोग फोफावला असून त्यावर सध्या कोणतेही रोग प्रतिबंधक औषध नसल्यामुळे सदरची रोगग्रस्त केळी उपटून फेकण्याशिवाय कुठलाच पर्याय शेतकऱ्यांपुढे उरला नाही.
शासनाने या रोगावर नियंत्रण आणणेसाठी प्रतिबंधात्मक औषध उपलब्ध करून द्यावे. व सध्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी अपेक्षा शेतकरी गोपाल बारी, यावल, यांनी व्यक्त केली आहे .

Protected Content