शिडीवरून खाली पडल्याने जखमी शेतकऱ्याचा मृत्यू !


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिरसोली शिवारातील शेतामधील खांबाजवळ शिडी लावून काम करीत असताना त्यावरून पडल्याने कैलास भिकाजी महाजन (वय ५२, रा. गणेशवाडी) यांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी २२ जून दुपारी दोन वाजेच्या सुमारास शिरसोली शिवारामधील शेतात घडली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील गणेशवाडी परिसरातील टेन्ट हाऊसचे मालक कैलास महाजन यांचे शिरसोली शिवारात शेत आहे. रविवारी २२ जून रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास ते त्यांच्या शेतातील एका खांबाजवळ शिडी लावून काम करीत होते. त्यावेळी शिडीवरून ते खाली पडले व त्यांच्या बरगड्यांना मार लागला. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. बराच वेळ ते व्यवस्थित बोलतही होते. मात्र नंतर अचानक प्रकृती खालावली व त्यांचा मृत्यू झाला. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला. मयताच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.