यावलकरांच्या माणुसकीने भारावले गुवाहाटीचे शर्मा कुटुंब !

यावल-अय्यूब पटेल| ‘हिच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे वागणे… माणसाने माणसाशी माणसासम वागणे’ या गीताला साजणारी व अशी शिकवण देणारी घटना यावल शहरात घडली आहे.

आसामच्या गुवाहाटी शर्मा हे कुटुंब त्यात एक६५ वर्षीय वयोवृद्ध व्यक्ती त्यांची धर्मपत्नी आणि मुलगी ते तीर्थक्षेत्रासाठी निघाले असता त्यांनी उज्जैन ( मध्य प्रदेश ) येथील महाकालचे दर्शन घेतले. यानंतर त्यांना शिर्डीला साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी जायचे होते. यामुळे ते बर्‍हाणपूर येथून यावल बसमधून येत होते. दरम्यान त्यांची पैशांची पर्स एटीएम आणि मोबाईल चोरीला गेला. हा प्रकार त्यांना यावल बस स्थानकावर उतरल्याने ते अक्षरश: हादरले. त्यांना काय करावे हे समजेनासे झाले.

दरम्यान, परक्या मुलखात असल्याने कुणाकडे मदत मागावी तरी कशी या विवंचनेत असतांना त्या वृध्द व्यक्तीने आपल्या हातातील महागडे घड्याळ विकण्यासाठी यावल शहरातील नगीना मस्जिद परिसरातल्या दुकानात ते आले. याप्रसंगी दुकानाचे संचालक मोहसीन भाई यांना इतक्या चांगल्या घरातील दिसणारा व्यक्ती घड्याळ का विक त आहे ? याबात शंका आली. यामुळे त्यांनी याबाबत विचारणा केली असता शर्मा यांनी त्यांना सर्व हकीकत सांगितली.

दरम्यान, त्यांच्यावर कोसळलेली आपत्ती पाहून मनसे कार्यकर्ते कुणाल बारी यांनी चेतन आढळकर मनसे जिल्हाध्यक्ष यांना फोन लावल्याने ते तात्काळ त्या ठीकाणी पोहोचले व त्यांची सर्व सत्य परिस्थिती जाणून घेतली आणि स्वतः एक हजार रुपये मदत केली. यानंतर यावल येथील सामाजीक कार्यकर्ते डॉ. कुंदन फेगडे, माजी प्रभारी नगराध्यक्ष राकेश कोलते , दुध व्यवसायाचे व्यापारी सचिन मिस्त्री, प्रमोद बारी ,गणेश येवले, अजय तायडे, शुभम वाणी यांना देखील मदत पाठविली. यातून शर्मा परिवाराला पाच हजार रुपये जमा करून चेतन आढळकर व त्यांचे मित्र परिवार यांनी त्यांना ती मदत केली. तसेच स्वतः यावल येथून रिक्षा करून दिली व भुसावळ रेल्वे स्टेशन वरती त्यांना त्यांच्या घरी जाण्याच्या प्रवासासाठी रवाना केले.

माणुसकीच्या नात्याने अशा लोकांना मदत करणे हे आपले कर्म आणि धर्म असल्याचे यातून दिसून आले आहे. यावलकरांनी केलेली संकटातील मदत पाहुन गुवाहाटीचे शर्मा कुंटुब भारावले व त्यांनी मदतीसाठी समोर आलेल्या सर्वांचे आभार मानले.

Protected Content