अपहार प्रकरणी सावदा मर्चंटच्या तत्कालीन व्यवस्थापकाच्या विरूध्द गुन्हा

सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कर्जदाराकडून वसूल केलेल्या साडे आठ लाख रूपयांचा भरणा न करता गैरव्यवहार करणार्‍या सावदा मर्चंट पतपेढीच्या तत्कालीन व्यवस्थापकाच्या विरूध्द आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, रवींद्र रमेश वाणी हे सावदा मर्चंट क्रेडीट कोऑपरेटीव्ह सोसायटीमध्ये मुख्य व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. त्यांनी पतपेढीच्या काही कर्जदारांकडून साडे आठ लाख रूपये जमा करून ते पतपेढीत न भरता स्वत: वापरले होते. या संदर्भात त्यांनी संबंधीत कर्जदारांना बनावट पावत्या दिल्या होत्या. त्यांनी पतपेढीचे दप्तर हे स्वत:कडेच ठेवले असून आजवर अनेकदा मागणी करून देखील ते जमा केले नव्हते. हा सर्व प्रकार सुमारे २०१२ ते २०२१च्या दरम्यान घडला होता.

दरम्यान, या संदर्भात तपास करण्यात आला असता सुमारे साडे आठ लाख रूपयांचा अपहार आढळून आला आहे. या अनुषंगाने सावदा मर्चंटचे मुख्य अवसायक राहूल प्रकाश मुजुमदार यांनी पोलीस स्थानकात तक्रार दिली. यानुसार रवींद्र रमेश वाणी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास सहायक पोलीस निरिक्षक जालींदर पळे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरिक्षक विनोद खांडबहाले करीत आहेत.

Protected Content