
जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ येथील निसर्ग तृतीयपंथी विकास फाउंडेशनच्या सदस्यांनी त्यांना होत असलेल्या अन्यायाविरोधात आवाज उठवला आहे. संस्थेचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि सभासद यांनी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना निवेदन देत, त्रास देणाऱ्यांविरोधात चौकशी करण्याची मागणी केली असून न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशाराही दिला आहे.
शमीभा पाटीलवर राजकीय दबावाचा गैरवापर केल्याचा आरोप
निवेदनात म्हटले आहे की, फैजपूर येथील शमीभा पाटील ही उच्चशिक्षित असून, एका मोठ्या राजकीय पक्षाशी संलग्न आहे. ती पोलिस आणि महसूल अधिकाऱ्यांवर दबाव टाकून तृतीयपंथी समाजातील सदस्यांना त्रास देत आहे. त्यांच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करून हद्दपारीच्या कारवाया सुरू केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
तीन वर्षांपासून समाजोपयोगी उपक्रम राबवणारी संस्था
निसर्ग तृतीयपंथी विकास फाउंडेशनने मागील तीन वर्षांत अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. आरोग्य शिबिरे, उन्हाळ्यात पाणपोई, तसेच गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप असे विविध उपक्रम या संस्थेमार्फत केले जातात. संस्था शांततेने समाजोपयोगी कार्य करत असून, आजवर त्यांच्या विरोधात कोणतीही तक्रार झालेली नाही, असे सदस्यांनी सांगितले.
१५ ऑक्टोबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा
संस्थेच्या सदस्यांनी निवेदनात नमूद केले आहे की, त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास बुधवारी (१५ ऑक्टोबर) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल. या आंदोलनात रेशमा कालीअप्पा पठाण, राखी तुळशीराम सूर्यवंशी, आशु श्रावण बाविस्कर, सारिका सावळे, रुपाली, भावना निकम, सोनी पाटील, तारा कुंवर, निकीता जान, खुशी जान, पूनम जान, जान्हवी जान आदी सभासद सहभागी होणार आहेत.
प्रशासनाने गांभीर्याने घ्यावी मागणी
या प्रकरणात प्रशासनाने निष्पक्ष चौकशी करून तृतीयपंथी समाजाच्या तक्रारींना न्याय द्यावा, अशी अपेक्षा निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. अन्यथा आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा इशाराही देण्यात आला आहे.



