
चोपडा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्य सरकारने नुकतेच अतिवृष्टी पॅकेज जाहीर करताना जळगाव जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांचा समावेश केला असतानाही चोपडा तालुक्याला या यादीतून वगळण्यात आल्याने शेतकरी वर्गात तीव्र नाराजी पसरली आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकरी कृती समितीच्या वतीने आज १४ ऑक्टोबर रोजी अकुलखेडा येथे सकाळी १० वाजता रास्ता रोको आंदोलन करून शासनाच्या अन्यायकारक धोरणाचा निषेध नोंदवण्यात आला.
अकुलखेडा गावाजवळ झालेल्या या आंदोलनात शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. आंदोलनाच्या दरम्यान कृती समितीचे एस.बी. पाटील यांनी रास्ता रोको दरम्यान शासनाविरोधात जोरदार आवाज उठवला. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, चोपडा तालुक्यातील शेतकरी आधी पावसाच्या अभावामुळे आणि नंतर झालेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान सहन करत आहेत. तरीदेखील या भागाला मदतीपासून दूर ठेवणे हे अन्यायकारक असून, सरकारने तातडीने या निर्णयावर पुनर्विचार करावा.
चोपडा तालुक्यातील शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, पंचनाम्याच्या प्रक्रियेतील ढिलाईमुळे शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळत नाही. शासकीय यंत्रणा असताना पंचनामे होत नाहीत, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. याशिवाय जवळील जिल्ह्यांतील परिस्थिती चोपडा तालुक्यासारखीच असताना अन्य तालुक्यांना मदत आणि चोपड्याला वंचित ठेवण्याचा निर्णय हा पक्षपाती असल्याचा आरोप करण्यात आला.
शेतकरी कृती समितीच्या वतीने तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना याबाबत निवेदन देण्यात आले. या निवेदनावर एस.बी. पाटील, कुलदीप पाटील, सुनील महाजन, सुधाकर महाजन, अविनाश महाजन, विष्णू पाटील, दत्तात्रय चौधरी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. शेतकऱ्यांनी निवेदनात चेतावणी दिली आहे की, जर लवकरात लवकर चोपडा तालुक्याचा समावेश पॅकेजमध्ये करण्यात आला नाही, तर दिवाळीच्या सणातही मोठे जनआंदोलन उभारले जाईल.
यावेळी पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने चोख बंदोबस्त ठेवून शांततेत आंदोलन पार पडले. मात्र शेतकऱ्यांच्या रोषामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.



