
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । देशात आणि राज्यात सातत्याने वाढणारी प्रचंड महागाई, पेट्रोल-डिझेलचे कडाडलेले दर, रासायनिक खतांची झालेली दरवाढ आणि शेतकऱ्यांच्या रात्रीच्या विजेमध्ये दोन तासांची केलेली कपात, या सर्व शेतकरी व जनविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी आज जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरात तीव्र आंदोलन करण्यात आले. शहरातील गजबजलेल्या पांडे चौक येथील पेट्रोल पंपासमोर काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत सत्ताधारी सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली आणि परिसर घोषणाबाजीने दणाणून सोडला.

केंद्रातील आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे आज शेतकरी, कष्टकरी, कामगार आणि सर्वसामान्य नागरिक होरपळून निघत आहेत, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. हक्काच्या विजेमध्ये कपात केल्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. सर्वसामान्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्यांच्या हक्कासाठी काँग्रेसने हे पाऊल उचलल्याचे यावेळी सांगण्यात आले. या आंदोलनात जळगाव जिल्ह्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकही मोठ्या संख्येने स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते.
या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष अविनाश भालेराव, माजी जिल्हाध्यक्ष धनंजय चौधरी, शहराध्यक्ष जमील शेख आणि हारून मुफ्ती नदवी यांनी केले. आंदोलनादरम्यान सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. या प्रसंगी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सरकारने ही जनविरोधी धोरणे आणि दरवाढ तातडीने मागे न घेतल्यास आगामी काळात यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी काँग्रेस नेत्यांनी दिला.



