पहूरमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही अतिक्रमण हटाव कारवाई 


पहूर (ता. जामनेर) – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  दिवाळी सारख्या महत्त्वाच्या सणाच्या उंबरठ्यावर पहूर येथे सलग दुसऱ्या दिवशीही अतिक्रमण हटाव मोहीम सुरूच राहिल्याने स्थानिक व्यावसायिक, दुकानदार आणि हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांमध्ये तीव्र नाराजीचा सूर आहे. दिवाळीपूर्वीच शेकडो छोट्या व्यवसायिकांचे अक्षरशः ‘दिवाळं’ निघाले असून, रोजगार गमावलेल्या बेरोजगार तरुणांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदवत शासनाच्या धोरणांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

जळगाव-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी मधोमध १५ मीटर अंतरापर्यंत अतिक्रमण हटवण्याची मोहीम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या निर्देशानुसार राबवली जात आहे. यापूर्वी ही मर्यादा १२.५ मीटर इतकी होती. मात्र, महामार्गाच्या नव्या श्रेणीकरणानंतर ती १५ मीटरपर्यंत वाढवण्यात आली असून, त्यानुसार नोटिसा देऊन अतिक्रमण काढले जात आहे. मात्र, ही मोहीम दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात राबविल्यामुळे अनेक लहान व्यावसायिकांवर आर्थिक घाला कोसळला आहे.

पहूर बस स्थानक परिसरात सुमारे १०० हून अधिक युवक छोट्या मोठ्या स्टॉल, हातगाड्या, चहा टपऱ्या, फळभाज्यांचे गाडे, स्टेशनरी व इतर लघु व्यवसायांद्वारे उपजीविका करत होते. ही अतिक्रमण हटाव मोहीम त्यांच्यासाठी कुऱ्हाड ठरली असून, अचानक आलेल्या बेरोजगारीमुळे त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. “सरकार एकीकडे रोजगार निर्मितीचे गाजर दाखवत आहे, तर दुसरीकडे आमचा असलेला रोजगारही हिरावून घेत आहे,” अशा भावना संतप्त युवक व्यक्त करत आहेत.

अनेक अतिक्रमणधारकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, दिवाळीसारखा सण संपेपर्यंत ही मोहीम स्थगित ठेवावी. पण प्रशासनाकडून कोणतीही सकारात्मक भूमिका न घेतल्याने असंतोष वाढत आहे. विशेष म्हणजे स्थानिक लोकप्रतिनिधी यावर मौन बाळगून आहेत, यामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढली असून, याचा थेट परिणाम आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर होण्याची शक्यता बोलली जात आहे.

या कारवाईवर टीका करताना सामाजिक कार्यकर्ते सुरेश घोंगडे यांनी म्हटले आहे की, “शासन व प्रशासन अतिक्रमण हटवण्याच्या नावाखाली सणासुदीच्या काळात हिटलरशाही पद्धतीने कारवाई करत आहे. यामुळे बेरोजगार युवकांच्या घरात दिवाळीचा दिवा नव्हे, तर अंधारच जाणार आहे.”