कासोदा येथे खोदकामात सापडले चांदीचे शिक्के व सोन्याचे दागीने !

जळगाव प्रतिनिधी । एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे घराचे खोदकाम करतांना पुरातन सोन्याचे व चांदीचे शिक्के व दागिने असा एकुण १९ लाख १७ हजार २८३ रूपये किंमतीचा मुद्देमाल आढळून आल्याने शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने हा मुद्देमाल जप्त करून कासोदा पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.

 

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून मिळालेली माहिती अशी की, एरंडोल तालुक्यातील कासोदा येथील रहिवाशी ताराबाई गणपती समदानी यांच्या जुन्या व पडक्या घराचे खोदकाम करण्याचे काम गावातील जेसीबी चालक जितेंद्र बिरबल यादव (वय-३२) , ट्रॅक्टर चालक ज्ञानेश्वर संतोष मराठे (वय-५०), संजय उर्फ सतिष साहेबराव पाटील (वय-३५) सर्व रा. कासोदा ता.एरंडोल आणि राहूल राजू भिल (वय-२४) रा. बोरगाव ता. धरणगाव ह.मु. कासोदा यांना देण्यात आले होते. घराचे खोदकाम सुरू असतांना या चार जणांना खोदकाम करतांना चांदीचे शिक्के आणि सोन्याचे दागिने मिळून आले. हे चांदीचे शिक्के सन १९०५ ते १९१९ कालावधीतील असून सोन्याचे दागिनेसुध्दा पुरातन काळातील असल्याने ते स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केले. त्यांची अंदाजित रक्कत १९ लाख १७ हजार २८३ रूपये किंमतीचे असल्याचे ज्वेलरी दुकानदाराकडून तपासणी करून खात्री केली आहे. सर्व दागिने व चांदीचे शिक्के कासोदा पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आले आहे.

Protected Content