रूंदीकरणाच्या कामाची चौकशी करा : जळगाव फर्स्ट

जळगाव प्रतिनिधी । शहरातून जाणार्‍या महामार्गाचे रूंदीकरण आणि याच्या विविध अंडरपासेसचे होणारे काम हे निकृष्ट दर्जाचे असून याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी जळगाव फर्स्ट या संस्थेने केली आहे. याबाबत संस्थेचे समन्वयक डॉ. राधेश्याम चौधरी यांनी केंद्रीय भुपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना पत्र पाठविले आहे.

शहरातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या सुरू आहे. यात रस्ता रुंदीकरण आणि अंडरपासच्या कामाचा समावेश आहे. खरं तर, बायपासने महामार्गाला शहराशी जोडणार्‍या दोन्ही टोकांपर्यंत या रस्त्याचे काम होणे अपेक्षित होते. शिवाय दोन्ही बाजूने समांतर रस्तेही अपेक्षित होते. तथापि, या ऐवजी फक्त ७ किलोमीटरच काम केले जात आहे. हे काम देखील निकृष्ट होत असून त्याची गुणवत्ता प्रथमदर्शनी खराब, निकृष्ट दर्जाची आहे. या कामाचे त्रयस्थ संस्था, एजन्सीमार्फत परीक्षण होण्याची गरज आहे. महामार्ग प्राधिकरण एकाच वेळी या रस्त्याचे काम करणार असून, त्यानंतर रस्ता नादुरुस्त झाल्यास त्याची जबाबदारी प्राधिकरणाची नसेल, पालिका या रस्त्याचे मेंटेनन्स करू शकणार नाही. त्यामुळे कामाच्या गुणवत्तेकडे लक्ष देणे आवश्यक असल्याची मागणी या पत्रात करण्यात आली आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्रीय भुपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहले असून याच्या प्रती माजी मंत्री गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना पाठविल्या आहेत.

Protected Content