चीअर्स : आता किराणा दुकान व सुपर मार्केटमध्ये मिळणार वाईन !

मुंबई प्रतिनिधी | राज्य सरकारने आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत सुपर मार्केट आणि किराणा स्टोअर्समधून वाईन विक्रीचा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधताना त्याबाबतची माहिती दिली. महाराष्ट्रात बर्‍याच वायनरी आहेत. त्यामुळे आता सरकारने नवीन पॉलिसी ठरवली आहे. सुपर मार्केटमध्ये वाइन विक्रीची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एक हजार स्क्वेअर फुटापर्यंतच्या सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला ठेवण्याची परवानगी देण्यात येणार आहे, असं नवाब मलिक यांनी सांगितलं.

मलिक पुढे म्हणाले की, शेतकर्‍यांच्या फल उत्पादनावर वायनरी चालते. त्यांच्या प्रोडक्ट्सला चालना देण्यासाठी ही परवानगी देण्यात आली आहे. सुपरमार्केटमध्ये एक स्टॉल म्हणजे एक शोकेस निर्माण करण्यात येणार आहे. तसा निर्णय झाला आहे. गोव्यात आणि हिमाचलात भाजपने हेच धोरण आणले आहे. त्यांची सत्ता असलेल्या अनेक राज्यात भाजपने वाइन विक्रीचं धोरण स्वीकारलं आहे. इथे मात्र विरोध करत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

Protected Content