सलून व्यवसाय पूर्ववत सुरु करण्यास परवानगी न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

जळगाव, प्रतिनिधी । कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी २३ मार्चपासून लॉक डाऊन जाहीर करण्यात आला आहे. या कालावधीत सलून व्यवसाय बंद असल्याने नाभिक समाजावर उपासमारीची वेळ आली असून त्यांना सर्व व्यवसाय सुरु करण्याची परवानगी द्या किंवा सलून व्यवसायिकांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी महाराष्ट्र नाभिक महामंडळ, जळगाव जिल्ह्यातर्फे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली.

आज महाराष्ट्रात लॉकडाऊनमध्ये बऱ्याच प्रमाणात सुट देवून इतर व्यवसाय सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु सलून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिलेली नाही. महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने वेळोवेळी स्मरणपत्र(निवेदन) देवून सलुन व्यवसाय सुरू करण्यास परवानगी किंवा आर्थिक मदतीची मागणी शासनाकडे केली होती. मागणी मान्य न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार हे आंदोलन महाराष्ट्र नाभिक महामंडळ अध्यक्ष कल्याण दळे यांच्या नेतृत्वाखाली आज ९ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनांची दखल घेऊन सलून व्यवसाय सुरु करण्यास परवानगी द्यावी किंवा सलून व्यवसायिकास १० हजार रु.तातडीने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. याप्रसंगी आंदोलनाची शासनाने दखल न घेतल्यास भविष्यात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनांवर जिल्हाध्यक्ष एकनाथ परशुराम शिरसाठ, प्रदेश कार्याध्यक्ष सूर्यवंशी यांच्या स्वाक्षरी आहेत.

Protected Content