“ऊसतोड कामगारांनी स्थलांतरापूर्वी नोंदणी करावी” – जिल्हाधिकारी यांचे आवाहन”

 

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून राज्यभर 17 सप्टेंबर, 2022 ते 02 ऑक्टोबर, 2022 या दरम्यान राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा राबविण्यात येत असून त्या दरम्यान सहायक आयुक्त समाज कल्याण विभागाच्या वतिने जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम जिल्हाभर राबविले जात आहेत.

त्याअंतर्गत जिल्ह्यातील उसतोड कामगारांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळणेकामी ऊसतोड कामासाठी बाहेरगावी स्थलांतर होण्यापूर्वी गट विकास अधिकारी, पंचायत समिती व ग्रामपंचयातीचे ग्रामसेवक यांच्या माध्यमातून उसतोड कामगारांची नोंदणी करून ओळखपत्र वाटपाचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले.

सेवा पंधरवाडा निमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दि.22.09.2022 रोजी बैठक घेण्यात आली असून त्यात ऊसतोड कामगारांना ओळखपत्राचे वाटप तसेच केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांकरिता मार्जिन मनी योजना व हाताने मैला उचलणा-या सफाई कामगाराच्या नियुक्तीस प्रतिबंध व त्यांचे पुनर्वसन करणेबाबत योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले.

सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाच्या वतीने ऊसतोड कामगांराच्या कल्याणासाठी व विविध योजनांच्या लाभासाठी ऊसतोड कामगारांची नोंदणी करुन ओळखपत्र देणे योजनेतंर्गत सद्यस्थितीत एकूण 35405 ऊसतोड कामगारांपैकी 8724 ऊसतोड कामगारांची नोंदणी करण्यात आली असून ओळखपत्र वाटप करण्यात आले आहेत. तसेच उर्वरित ऊसतोड कामगारांचे सर्व्हेक्षण व नोंदणी करुन ओळखपत्र देण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी प्रशासनास निर्देश दिले आहेत तसेच संबंधित ऊसतोड कामगार यांनी देखील आपल्या गावातील ग्रामपंचयातीचे ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधून नोंदणी करणेबाबत जिल्हाधिकारी यांनी आवाहन केले आहे.

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. जळगाव, महिला व बालविकास अधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाचे प्रतिनिधी, लीड बँकेचे प्रतिनिधी, तसेच विविध मागासवर्गीय विकास महामंडळांचे प्रतिनिधी, जिल्हा उद्योग केंद्राचे प्रतिनिधी व सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव यावेळी बैठकीस उपस्थित होते.

Protected Content