राजे छत्रपती शिवाजी उद्यानाची लाखो रुपये खर्चून देखील दुरवस्था

मुक्ताईनगर, प्रतिनिधी |  केंद्र शासनाच्या माध्यमातून स्वच्छ भारत अभियान हा उपक्रम राज्यासह संपूर्ण देशात राबविण्यात येत असतांना मुक्ताईनगरच्या परिवर्तन चौकात असलेल्या राजे छत्रपती शिवजी महाराज उद्यानाची नगरपंचायत प्रशासनातर्फे लाखो रुपये खर्चून देखभाल दुरूस्ती करण्यात येत नसल्याने या उद्यानाची दयनीय अवस्था झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

 

केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियान या योजनेची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी म्हणून  वित्त आयोगाच्या माध्यमातून वेळोवेळी  लाखो रूपयांचा निधी हा संबंधित  प्रशासनाला देत आहे. मुक्ताईनगर न.प. प्रशासनाद्वारे स्वच्छ भारत मिशन  या मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला तिलांजली दिली जात आहे. मुक्ताईनगर शहराच्या केंद्रस्थानी असलेल्या परिवर्तन चौकात राजे छत्रपती शिवाजी महाराज उद्यानअसून  या उद्यानाच्या देखभालीसाठी मुक्ताईनगर न.पं.प्रशासनाद्वारे लाखो रुपयांचा निधी खर्च दाखवला जात आहे. प्रत्यक्ष वस्तुस्थिती मात्र अत्यंत दयनीय आहे.  सदर उद्यानामध्ये पाय ठेवण्यासही जागा नाही एवढे गवत वाढलेले आहे. हे  उद्यान हे चोवीस तास उघडे असून  बहुतांश व्यसनाधीन लोक तेथे व्यसन करतात. उद्यानाच्या नावाखाली उद्यान की शराबखाना असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडलेला आहे.

राजे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान हे शहराच्या मधोमध असून येथेच बस थांबे सुद्धा असल्यामुळे ये जा करणाऱ्या  प्रवाशांनी या  उद्यानाकडे बघितल्यावर नाक मुरडले जाते.  एवढी दुर्गंधी व भयावह परिस्थिती या उद्यानाची न.प. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे झालेली आहे. शहरातील नागरिकांद्वारे वारंवार तक्रारींनंतरही न.प.प्रशासन सोयीस्कररीत्या कानाडोळा करीत आहे.  तरी आपण आपल्या स्तरावरून  मुक्ताईनगर न.प.अंतर्गत असलेल्या राजे छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाची दुरावस्था तात्काळ सुधारण्याचे आदेश देऊन कामात केलेल्या दिरंगाईची चौकशी करून दोषींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करावा अन्यथा तीव्र जनआक्रोश आंदोलन छेडण्यात येईल याची प्रशासनाने नोंद घ्यावी असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

 

Protected Content