खिरोदा येथे तज्ञांकडून फलोत्पादन महाविद्यालयाच्या जागेची पाहणी (व्हिडीओ)

aa.hair bhau pahani

फैजपूर, प्रतिनिधी | रावेर-यावल तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या फलोत्पादन महाविद्यालयाच्या जागेची पाहणी राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.के.पी. नाथा यांच्यासह २० जणांच्या चमूने खिरोदा येथे आज (दि.२४) प्रत्यक्ष येऊन केली. यावेळी कृषी परिषदेचे उपाध्यक्ष आ. हरिभाऊ जावळे, रावेर येथील तहसिलदार उषाराणी देवगुणे व संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांनी या चमुला माहिती दिली. यावेळी कुलगुरूंनी जागेसंदर्भात समाधान व्यक्त केले.

२०१६ मध्ये आ.एकनाथराव खडसे कृषीमंत्री असतांना जिल्ह्यासाठी पाल येथे फलोत्पादन महाविद्यालय मंजूर करण्यात आलेले होते, मात्र पाल येथे तांत्रिक अडचणी येत असल्याने खिरोदा येथे हे महाविद्यालय उभारण्यात येते असून त्यासाठी जागेची पाहणी करण्यात आली. खिरोदा जानोरी रस्त्यावर जिल्ह्यातील पाहिले फलोत्पादन महाविद्यालय उभे राहणार आहे.

यावेळी आ.जावळे यांनी माहिती देताना सांगितले की, खिरोदा-जानोरी रस्त्यावरील ७० हेक्टर जमिनीवर महाविद्यालयाची उभारणी होणार असून त्यासाठी खिरोदा ग्रामपंचायतीने जमीन उपलब्ध करून देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी उभ्या राहणाऱ्या या महाविद्यालयातील आदिवासी तसेच तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून शेतकऱ्यांना घरी बसून संशोधनाचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे हे महाविद्यालय शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे.
तसेच हिंगोणा येथे केळी संशोधन केंद्रासाठी ६० एकर जागा राहुरी कृषी विद्यापीठाने घेतली आहे. त्याठिकाणीही त्वरित प्रकल्प उभा रहावा, या प्रकल्पातून केळी उत्पादक शेतकऱ्यांना ग्रँड नाईन या केळी वाणापेक्षाही सरस विद्यापीठाने संशोधन करून निर्मित केलेल्या फुले प्राईट हे केळी वाण या संशोधन केंद्रातून विकसित करण्यात येणार आहे. अशी माहितीही आ जावळे यांनी दिली.

यावेळी राहुरी कृषी विद्यापीठातून आलेल्या पथकासोबत कार्यकारी परिषद सदस्य डॉ. पंकज महाले, कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ.अशोक फरांदे, संशोधन संचालक डॉ.शरद गडाख, कुलसचिव सोपान कासार, उद्यानविद्या विभागप्रमुख डॉ.शरद रनपिसे, डॉ.भालेकर, डॉ.ढाकरे, विद्यापीठ अभियंता मिलिंद ढोके, उपकुलसचिव पी.टी. सूर्यवंशी, धूळे कृषी महाविद्यालयाचे डॉ.पंकज सौंदर, जळगावच्या तेलबिया संशोधन केंद्रांचे डॉ. सुदाम पाटील, कृषी विद्यापीठाचे सदस्य नरेंद्र पाटील, गोविंद तायडे, गणेश देशमुख यांच्यासह खिरोदा सरपंच संताबाई भारंबे, उपसरपंच राहुल चौधरी, प्रशांत तायडे, चिनावल सरपंच भावना बोरोले, माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षल पाटील, संजय गांधी निराधार योजनेचे विलास चौधरी, डॉ.आर.एम. चौधरी व प्रकल्प समन्वयक ललित बोंडे उपस्थित होते.

 

 

Protected Content