चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वीज कर्मचारी संयुक्त संघर्ष समितीतर्फे मागण्यांसाठी दोन दिवसाचा संप सुरु असून ऊर्जा मंत्र्यांनी आज सर्व संघटनांच्या प्रमुख प्रतिनिधींशी व्हिडिओ कॉन्फरन्स वरून चर्चा करत संप मागे घेण्याची विनंती केली. मात्र ‘खाजगीकरण करणार नाही; असे लेखी द्या आणि समक्ष चर्चा करा.’ अशी मागणी करत तूर्त संप चालूच राहील असे संघटना प्रतिनिधींनी सांगितले आहे.
वीज कर्मचाऱ्यांवर विधायक प्रभाव असणाऱ्या सर्व संघटना संपात सामील झाल्या आणि महाराष्ट्रातील वीज निर्मिती बंद व्हायला लागली .राज्य अंधारात जाईल अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे मा.ऊर्जा मंत्र्यांना नाईलाजाने का होईना आज सर्व संघटनांच्या प्रमुख प्रतिनिधींशी व्हिडिओ कॉन्फरन्स वरून चर्चा केली. उशिराने चर्चा करतो म्हणून दिलगिरी व्यक्त केली आणि संप मागे घेण्याची विनंती केली.
याबाबत संघटना प्रतिनिधींनी ‘एकमुखाने खाजगीकरण करणार नाही असे लेखी द्या आणि समक्ष चर्चा करा.’ अशी मागणी केली असून उद्या दिनांक २९ रोजी चर्चा केली जाईल असे सांगण्यात आले. त्यानुसार “मा.ऊर्जा मंत्र्यांसोबत बैठक होवून त्यात संपाबाबत आणि पुढील आंदोलनाबाबत निर्णय घेतला जाईल. तूर्त संप चालूच राहील. जो पर्यंत संयुक्त संघर्ष समितीतर्फे अधिकृत जाहीर केले जात नाही तो पर्यंत कर्मचाऱ्यांनी अफवांना बळी पडू नये.” असे ही आवाहन करण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी संयुक्त संघर्ष समिती आणि महाराष्ट्र राज्य वीज कंत्राटी कामगार संघटना कृती समिती चाळीसगाव विभागात सर्व कर्मचारी संपात सहभागी आहेत. यात अतिरिक्त कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता, सहाय्यक लेखापाल, ऑपरेटर, लिपिक, तंत्रज्ञ, शिपाई, कंत्राटी कामगार असे सर्व संवर्गातील कर्मचारी यात सामील आहेत.