‘त्या’ दाम्पत्याला मारहाण केल्याप्रकरणी शिवसैनिकांवर गुन्हा दाखल

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुख्यमंत्र्यांविषयी कुठलीही आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केलेली नसतांना देखील शिवसैनिकांनी दाम्पत्याला आयनॉक्स थिएटरबाहेर रविवारी बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत दोघांना गंभीर दुखापत झाली असून महिलेल्या गळ्यातील मंगळसूत्र गहाळ झाले. याप्रकरणी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांवर शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत फिर्यादी प्रमाणे, धरणगाव येथील हेमंत नवनीतलाल दुतिया (वय-४८, रा. भाटीया गल्ली) हे कॉटन जिनिंग मिलमध्ये नोकरीस आहे. हे रविवार, दि.२७ रोजी पत्नी, लहान मुलगी व सासरे हारेश प्रेमजी भाटे यांच्यासोबत दुपारी ३ वाजता खान्देश सेंट्रल मॉलमधील आयनॉक्स थिएटरमध्ये चित्रपट बघण्यासाठी आले होते.

चित्रपट सुटल्यानंतर सायंकाळी ६.४५ वाजेच्या सुमारास ते चित्रपटगृहाच्या बाहेर आले असता. यावेळी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, राजेंद्र किसन महाजन रा. लहान माळीवाडा धरणगाव, धिरेंद्र पुरभे, गजानन मालपुरे, महानगरप्रमुख शरद तायडे, शोभा चौधरी, सरीता माळी, भिमा धनगर रा. नेहरुनगर धरणगाव यांच्यासह चार ते पाच जणांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट का टाकली? असे म्हणत बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

दरम्यान, दुतिया यांनी मी अशी कोणतीही पोस्ट टाकलेली नाही असे सांगत असतांना देखील त्यांनी चापटांसह लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत जखमी केले. हेमंत दुतिया यांना शिवसैनिक मारहाण करीत असतांना त्यांची पत्नी गौरी या त्यांना सोडविण्यासाठी गेल्या. यावेळी शिवसैनिकांकडून त्यांना देखील मारहाण करण्यात आली. या झटापटीत गौरी दुतिया यांच्या गळ्यातील मंगळसूत्र तुटून गहाळ झाले असून त्यांच्या हाताला मार लागला आहे.

मारहाणीत शिवसैनिकांनी हेमंत दुतिया यांच्या डोळ्यासह नाकावर बुक्क्यांनी मारहाण केली. त्यामुळे त्यांच्या नाकातून रक्त बाहेर येत असून त्यांच्या शर्ट देखील फाटले आहे. तसेच त्यांना वाईट शिवीगाळ करीत त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी हेमंत दुतिया यांच्या तक्रारीवरुन मारहाण करणार्‍या शिवसैनिकांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!