नशिराबाद, ता. जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नशिराबाद नगरपरिषदेतर्फे आज राबविण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेला बसस्थानक परिसरात हिंसक वळण लागले. या कारवाईदरम्यान अतिक्रमण निर्मूलन समितीचे अध्यक्ष कीर्तीकांत चौबे यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याच्या प्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने स्थापत्य अभियंता शुभम जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तीन ते चार अज्ञात व्यक्तींविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नशिराबाद पोलीस करीत आहेत.

नगरपरिषद प्रशासनाकडून अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येत असताना बसस्थानक परिसरात काही जणांनी विरोध केला. यावेळी जमावाकडून अतिक्रमण निर्मूलन समितीचे अध्यक्ष कीर्तीकांत चौबे तसेच उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करण्यात आली. त्यांच्यावर हल्ला करण्याचाही प्रयत्न झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेनंतर नगरपरिषद प्रशासनाने पोलिसांत धाव घेतली. स्थापत्य अभियंता शुभम जाधव यांच्या फिर्यादीवरून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेतील संबंधित व्यक्तींची ओळख पटविणे आणि पुढील तपास करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.



