प्रशांत भूषण भूमिकेवर ठामच ; माफी याचना नाही म्हणजे नाही !!

 

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । न्यायपालिका अवमानना वादात ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयाला माफी मागण्यास स्पष्ट आणि नम्र शब्दांत नकार दिलाय. ‘माझे वक्तव्य सद्भावनापूर्ण होते. माफी मागितली तर माझ्या सदसदविवेकबुद्धीचा तसंच आपण ज्या संस्थेवर सर्वाधिक विश्वास ठेवतो त्याचा अवमान होईल’ असंही त्यांनी म्हटलंय. सर्वोच्च न्यायालयानं प्रशांत भूषण यांना २४ ऑगस्टपर्यंत आपल्या विधानांसाठी पुनर्विचार आणि कोणत्याही अटीविना माफी मागण्यासाठी वेळ दिला होता.

सोमवारी प्रशांत भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयात आपलं उत्तर दाखल केलं. ‘आजच्या चिंताग्रस्त क्षणी भारताच्या लोकांची कशावर आशा असेल तर ती सर्वोच्च न्यायालायावर आहे. ती देशातील निरंकुश व्यवस्थेसाठी नाही तर देशात कायदे व्यवस्था आणि संविधान प्रस्थापित राहवं यासाठी… त्यामुळे जेव्हा गोष्टी आपला मार्ग भटकताना दिसतात तेव्हा आपण बोलावं . या न्यायालयातून मिळालेल्या जबाबदारीची जाणीवच आपल्याला हे विशेष कर्तव्य देते. माझे वक्तव्य सद्भावनापूर्ण होते. मी सर्वोच्च न्यायालयाच्या कोणत्याही न्यायाधीशांना निशाणा बनवण्यासाठी टिप्पणी केली नव्हती. ती माझी सकारात्मक टीका होती’ असं त्यांनी आपल्या उत्तरात म्हटलंय.

ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांनी न्यायपालिका आणि सरन्यायाधीशांविरुद्ध जून २०२० मध्ये दोन ट्विट केले होते. ‘माजी १६ सरन्यायाधीशांमध्ये निम्म्याहून अधिक सरन्यायाधीश भ्रष्ट होते’ असं या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं होतं. त्यांनी काही न्यायाधीशांवर टीकाही केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठानं प्रशांत भूषण यांना दोषी करार ठरवलेलं आहे

२४०० हून अधिक भारतीय वकिलांनी प्रशांत भूषण यांच्या समर्थनार्थ ऑनलाईन याचिका दाखल केलीय. आज पुण्यातही अनेक वकील प्रशांत भूषण यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरलेले दिसले. शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाच्या आवाराबाहेर वकिलांनी काळ्या फिती बांधून भूषण यांच्याविरोधातील कारवाईचा निषेध केला.

Protected Content