झाले एकदाचे : एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आज दिवसभर अनेक नाट्यमय घटना घडल्यानंतर अखेर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेच्या फुटीर गटाचे प्रमुख एकनाथ संभाजी शिंदे तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र गंगाधरपंत फडणवीस यांनी शपथ घेतली आहे. या दोघांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली.

आज दुपारी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्तेचा दावा दाखल केला. यानंतर पत्रकार परिषद घेण्यात आली. यात त्यांनी सर्वांना धक्का देत शिंदे यांचे नाव जाहीर केले. याप्रसंगी फडणवीस म्हणाले की, सायंकाळी साडे सात वाजता एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. ते एकटेच मुख्यमंत्री बनणार आहेत. भारतीय जनता पक्षाच्या गटाने त्यांना पूर्णपणे समर्थन दिले आहे. मी स्वत: या मंत्रीमंडळात राहणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लवकरच मंत्रीमंडळाचा विस्तार होणार असून यात भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या तसेच काही अपक्ष मंत्र्यांचाही समावेश असेल अशी माहिती त्यांनी दिली. आपण बाहेर राहणार असून हे सरकार चांगले चालावे यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची माहिती त्यांनी याप्रसंगी दिली.

यानंतर मात्र तासाभरातच ाजपचे केंद्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी एक व्हिडीओ संदेश जारी केला. यात ते म्हणाले की, भारतीय जनता पक्षाला सत्तेचा मोह नसून याचमुळे आम्ही शिंदे यांना पाठींबा दिला आहे. फडणवीस यांनी मंत्रीमंडळात राहणार नसल्याचे जाहीर केेले नसले तरी फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री बनावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. यानंतर ट्विट करून त्यांनी फडणवीस हे उपमुख्यमंत्री बनणार असल्याचे ट्विट केले. लागलीच अमित शाह यांनी देखील ट्विट करून फडणवीस हे उपमुख्यमंत्री बनणार असल्याचे जाहीर केले. यामुळे राजभवनात एकनाथ शिंदे यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीची तयारी करण्यात आली.

यानंतर साडेसात वाजेच्या सुमारास राजभवनातील दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आगमन झाले. प्रारंभी एकनाथ शिंदे यांनी ईश्‍वराला साक्ष ठेवत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांनी प्रारंभी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे स्मरण केले. तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यामुळे आता राज्यात शिवसेनेचा बंडखोर गट, भाजप आणि अपक्ष यांच्या आघाडीचे सरकार सत्तारूढ झाले आहे.

Protected Content