…तर मलाही येऊ शकते ईडीची नोटीस ! : रोहित पवार

नवी मुंबई प्रतिनिधी । ईडीच्या माध्यमातून भाजप विरोधकांना धमकावत असल्याचा आरोप करत कदाचित आपल्यालाही ईडीची नोटीस येऊ शकते अशी शक्यता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी वर्तविली आहे. आज भल्या पहाटे नवी मुंबई एपीएमसीला दिलेल्या भेटीनंतर ते माध्यमांशी बोलत होते.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आज पहाटे चार वाजताच नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट दिली. त्यांनी एपीएमसीमधील भाजी आणि फळ मार्केटचा दौरा केला. यावेळी रोहित पवार एपीएमसीमधील व्यापारी तसंच काही शेतकर्‍यांशी चर्चा करत एपीएमसीमधील यंत्रणा समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ठिकठिकाणी थांबून व्यापारी आणि शेतकर्‍यांची विचारपूस केली. शेतकर्‍यांना आणि व्यापार्‍यांना एपीएमसीमध्ये येणार्‍या अडचणी येत्या अधिवेशनात मांडणार, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

याप्रसंगी रोहित पवार यांनी भाजपवर टीका केली. ते म्हणाले की, सर्वसामान्यांना सुद्ध आता ईडीसारखी संस्था गेल्या पाच वर्षात फक्त राजकीय हेतूने वापरली जात असल्याचं लक्षात आलं आहे. इतकी मोठी संस्था फक्त राजकीय दृष्टीकोनातून वापरली जात जात आहे. त्यात काही निष्पन्न होत नाही. महाराष्ट्रातील काही नेत्यांच्या चौकशीबद्दल रोहित पवार म्हणाले की, उद्या मलाही ईडी नोटीस पाठवेल अशी शक्यता त्यांनी वर्तविली. तर, ईडीच्या माध्यमातून भाजपकडून विरोधकांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी याप्रसंगी केला.

Protected Content