नवी दिल्ली वृत्तसंस्था । आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांच्याविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. शुक्रवारी ईडीने चंदा कोचर आणि त्यांच्या कुटुंबियांची ७८ कोटीं संपत्ती जप्त केली आहे. बेकायदा कर्ज आणि अन्य गैरव्यवहाराप्रकरणी त्यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे.
चंदा कोचर यांचे मुंबईतील घर आणि त्यांच्या पतीच्या कंपनीच्या काही संपत्तीचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान, याच प्रकरणी ईडीने १ मार्च २०१९ रोजी चंदा कोचर यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयांमध्ये त्याचबरोबर व्हिडिओकॉन समुहाचे प्रमुख वेणूगोपाल धूत यांच्या निवासस्थानी आणि कंपनीच्या कार्यालयांवर छापे टाकले होते.
ईडीने पीएमएलए कायद्यातील तरतुदींनुसार यापूर्वीच चंदा कोचर, दीपक कोचर, वेणूगोपाल धूत आणि अन्य काही व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आयसीआयसीआय बँकेकडून व्हिडिओकॉन समूहाला १८७५ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करताना गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.