कुंझर येथील विहिरीत आढळला ‘त्या’ बालकाचा मृतदेह (व्हिडीओ)

jayesh chaudhari crime

 

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील कुंझर येथे पाचवीत शिकणाऱ्या बालकाचा मृतदेह आज (दि.10) सकाळी 11 वाजेच्या सुमारास गावालगतच्या विहीरीत आढळून आला आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. बालकाचा घातपात असल्याचा संशय कुटुंबियाकडून व्यक्त होत असून मुलाचे इनकॅमेरा शवविच्छेदनाची मागणी करण्यात येत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जयेश श्रावण चौधरी (वय-११) असे मृत मुलाचे नाव आहे. जयेश इयत्ता पाचवीत शिकत होता. सायंकाळी 6 वाजता तो गावातीलच बापु महाजन यांच्याकडे नेहमीप्रमाणे शिकवणीस गेला. शिकवणी करून रात्री 8 वाजता घरी परतला. त्यावेळी श्रावण दगडू चौधरी (वडील) यांनी त्यास न्हावीकडे जावून कटींग करून घेण्यास सांगितले, पण जयेश याने मी उद्या जाईल असे वडिलांना सांगितले. त्यानंतर श्रावण चौधरी हे गावातीलच शेतीगटाच्या बैठकीसाठी निघून गेले. बैठक झाल्यावर चौधरी घरी गेल्यावर घरातील लोकांनी त्यांना विचारले, जयेश तुमच्याबरोबर आला होता का ? यावर चौधरी यांनी नाही सांगितले. त्यानंतर चौधरी यांच्यासह त्यांची पत्नी, आई व भाऊ यांनी गावात तसेच परिसरात शेती शिवारात शोध घेतला पण जयेश कोठेही मिळून आला नाही. ही सर्व घटना (दि.8 बुधवार) रोजी घडली आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यामार्फत गावात जयेश हरविल्याची दंवडीही देण्यात आली. त्यामुळे जयेश कुठे गेला, त्याचे काय झाले असेल याची चिंता चौधरी कुटुंबियांना लागून होती. दोन रात्रीपासून जयेश याचे कुटुंबिय व नातलग जयेश याचा कुंझर परिसरात शोध घेत होते. त्यामुळे जयेशचे (वडील श्रावण चौधरी) यांनी मेहूणबारे पोलीस ठाण्यात धाव घेऊन मुलगा बेपत्ता असल्याची माहिती दिली.

कोणतेही धागेदोरे मिळले नाही
कुंझर येथील मुलाचे अपहरण झाल्याची माहिती कळताच पोलीस उप अधीक्षक सचिन गोरे, मेहूणबारे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे व उपनिरीक्षक हेमंत शिंदे यांच्या पथकांनी कुंझर परिसरात श्वान पथकासह परिसर पिंजून काढला. मात्र जयेशचा कोणताही सुगावा लागला नाही.

विहीरीत आढळला मृतदेह
बेपत्ता जयेश याचा कुटुंबीयासह मेहूणबारे पोलीस शोध घेत असतांनाच आज (दि.10) शुक्रवार रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास कुंझर गावापासून एक किमी अंतरावर कुंझर शिवारात शेरूळ रस्त्यावर असलेल्या किशोर गोसावी यांच्या शेतातील विहीरीत जयेश याचा मृतदेह तरंगलेल्या अवस्थेत शेतमालक किशोर गोसावी यांना दिसला. हादरलेल्या गोसावी यांनी ही घटना गावकरी व पोलीस पाटील यांना दिली. पोलीस पाटलांनी मेहूणबारे पोलीसांना कळविले. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे व उपनिरीक्षक यांच्यासह गृहरक्षक दलाचे जवान घटनास्थळी जावून पंचनामा करत मृतदेह विहिरीबाहेर काढला. तसेच विहीरमालकाचा जाब-जबाब घेण्यात आला. यावेळी जयेश याच्या कुटुंबासह गावकऱ्यांची एकच गर्दी याठिकाणी केली. जयेश याचा मृतदेह विहीरीतून बाहेर काढल्यावर जयेशच्या आई वडिलांनी एकच टाहो फोडला. जयेशला विहरीतून बाहेर काढल्यानंतर त्याच्या डोकावर, तोंडाजवळ जखमा झाल्याचे दिसून आल्या आहेत. दरम्यान जयेशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आला. यावेळी जयेशच्या कुटुंबियांनी इनकॅमेरा शवविच्छेदनाची मागणी केलीय.

घातपात असल्याचा कुटुंबियांचा संशय
(दि.8) बुधवारी रात्रीपासून बेपत्ता झालेल्या जयेश याचा दोन दिवसांपासून शोध घेतला जात होता. त्याचा काही घातपात तर झाला नाही ना अशी शंका कुटुंबियांना आली. कुंझर परिसरातील सर्व विहीरींची पाहणी केली. आज जयेश याचा मृतदेह ज्या विहीरीत सापडला ती विहीरचीही काल पाहणी केली होती. आज त्याच विहीरीत जयेशचा मृतदेह तरंगतांना आढळून आला. मृतदेहासोबत त्याच्या पायात चप्पलही आढळून आली. त्यामुळे हा घातपाताचाच प्रकार असावा, असा संशय कुटुंबियांकडून व्यक्त होत आहे. जयेश याचा मृत्यु हा घातपाती असून जे कोणी या मुलाच्या मृत्युस जबाबदार असतील त्यांचा शोध घेऊन कडक कारवाई करण्याची मागणी जयेशच्या कुटुंबियांनी केली.

Protected Content