जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील आव्हाणरोड परिसरातून वाळूची चोरटी वाहतूक करणारे डंपरवर पोलीसांनी कारवाई करत वाळूने भरलेले डंपर जप्त केले आहे. डंपर चालकाला पोलीसांनी ताब्यात घेतले असून रविवारी ९ जुलै रोजी सकाळी ८ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत ठाकूर आणि पोलीस नाईक उमेश ठाकूर हे दोघेजण रविवारी ९ जुलै रोजी मध्यरात्री जळगाव तालुक्यातील आव्हाणा रोडवर रात्री गस्तीवर असतांना पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास वाळूची चोरटी वाहतूक करतांना डंपर आढळून आले. पोलीसांनी डंपरला रस्त्यावर थांबवून चालक प्रविण झावरू सपकाळे (वय-३५) रा. आंबेडकर नगर, आव्हाणा ता.जि.जळगाव याला वाळू वाहतूकीबाबत परवाना विचारला. त्यानंतर चालकाकडे वाळू वाहतूकीचा कोणताही परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर चालकाला ताब्यात घेवून पोलीसांनी वाळूने भरलेले डंपर जप्त केले. पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सकाळी ८ वाजता चालक प्रविण सपकाळे याच्या विरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक उमेश ठाकूर करीत आहे.