भाजपा जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर महाराज यांच्या वाहनाचा अपघात

जळगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी। भाजपाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांच्या वाहनाचा (एम.एच.१८, ए.जे.२५२६) मोठा अपघात बुधवारी १३ मार्च रोजी पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास विटनेर-पळासखेडा रस्त्यावर झाल्याची घटना घडली. या अपघातात ज्ञानेश्वर महाराज जळकेकर व त्यांचे ड्रायव्हर आनंदा नेवे यांना दुखापत झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ज्ञानेश्वर जळकेकर हे मंगळवारी नगर जिल्ह्यातील एका ठिकाणी किर्तनाच्या कार्यक्रमाला गेले होते. किर्तनाचा कार्यक्रम आटोपून रात्री आपल्या गावाकडे परत येत असताना, बुधवारी १३ मार्च रोजी पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास ड्रायव्हर आनंदा नेवे यांना डुलकी लागल्याने वाहनाचा ताबा सुटला. नियंत्रण झालेले वाहन रस्त्याच्या पलीकडे धडकले, सुदैवाने वाहन धडकल्यानंतर कारमधील सर्व एअरबॅग उघडल्यामुळे दोघांनाही गंभीर स्वरुपाची दुखापत झाली नाही. मात्र, या अपघातात वाहनाचे मोठे नुकसान झाले. रात्री अपघात झाल्यानंतर परिसरातील काही शेतकरी, शेतातून पाणी भरून येत असताना त्यांच्या लक्षात आल्यानंतर तातडीने दोन्ही जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांच्या खांद्याला दुखापत झाली आहे. तर ड्रायव्हर आनंदा नेवे यांना मुका मार लागला आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेबाबत पोलीसात अद्याप नोंद करण्यात आलेली नाही.

Protected Content