मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लोकसभा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे. मात्र, या दिवशी ड्राय डे घोषित करण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयाला हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि बारच्या मालकांच्या संघटनेने विरोध केला असून या विरोधात संघटनेने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत मुंबई शहर आणि उपनगरीय जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशांना आव्हान दिले आहे.
इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनने वकिल वीणा थडानी आणि विशाल थडानी यांच्यामार्फत दोन स्वतंत्र याचिका दाखल केल्या आहेत, ज्यात असा दावा करण्यात आला आहे की, मतांची मोजणी सुरू असताना संपूर्ण दिवस मद्यविक्रीवर बंदी घालणे म्हणजे मनमानी निर्णय आहे. दुपारपर्यंत निवडणुकीचे निकाल जाहीर होतील, अशा परिस्थितीत संपूर्ण दिवस ड्राय डे घोषित करणे चुकीचे आहे.
या याचिकेवर आज बुधवारी सुट्टीतील खंडपीठासमोर सुनावणी होण्याची शक्यता आहे. याचिकेनुसार, याचिकाकर्त्या संघटनेने एप्रिलमध्ये मुंबई शहर जिल्हाधिकारी आणि मुंबई जिल्हा उपनगर जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधला होता आणि त्यांना ४ जूनचा संपूर्ण दिवस ड्राय डे म्हणून घोषित करण्याच्या त्यांच्या निर्णयाचे पुनरावलोकन करण्याची विनंती केली होती. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार आदेश देण्यात आल्याने हा निर्णय मागे घेतला जाऊ शकत नाही असे स्पष्ट केले.
असोसिएशने केलेल्या दोन्ही याचिकांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की असोसिएशनचे सदस्य व्यवसाय करण्यासाठी राज्य सरकारला परवाना शुल्क म्हणून मोठ्या प्रमाणात पैसे देतात, तर अनेक अवैध दारू उत्पादक आणि पुरवठादार अवैध दारूचे उत्पादन आणि विक्री करून आमचे नुकसान करतात. जेव्हा शहरातील अधिकृत दारू विक्रीची दुकाने बंद केली जातात, तेव्हा दारू तस्कर छुप्या मार्गाने बनावट दारूची विक्री करतात. त्यामुळे अवैध धंदे फोफावतात व चुकीच्या मार्गाने मोठ्या प्रमाणात नफा कमावतात. याचा परिमाण आमच्या व्यवसायावर होत आहे. त्यामुळे मद्यविक्री करणाऱ्या आस्थापनांना निकाल जाहीर झाल्यानंतर व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात यावी, असे असे याचिकेत म्हटले आहे.